नवी दिल्ली : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आलेल्या महापूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे जीवितहानी आणि वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत दिली. (amit shah statement in rajya sabha on chamoli glacier uttarakhand tragedy)
हिमकडा कोसळून आलेल्या महापूरामुळे १३.२ मेगाव्हॅटचा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. तसेच तपोवन येथील ५२० मेगाव्हॅट प्रकल्पाचेही नुकसान झाले आहे. आताच्या घडीला या क्षेत्रातील सखल भागांना कोणताही धोका नाही, असे उत्तराखंड सरकारकडून सांगण्यात आले आहे, असेही अमित शहा म्हणाले.
परिस्थितीवर २४ तास देखरेख
चमोली येथून ५ हजार ६०० मीटर उंचीवर असलेला हिमकडा कोसळला. १४ वर्ग कि.मी. क्षेत्राएवढा याचा अवाका होता. या हिमस्खलनामुळे महापूर आला, असेही अमित शहा यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून २४ तास या घटनेनंतर देखरेख ठेवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज स्थितीवर देखरेख ठेवून आहेत. गृह मंत्रालयातील नियंत्रण कक्षाकडूनही नियमित अंतराने माहिती घेतली जात आहे, अशी माहिती अमित शहा यांनी दिली.
कधीही पाकिस्तानात गेलो नाही, हे माझं भाग्य: गुलाम नबी आझाद
केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत
केंद्र सरकारकडून उत्तराखंड सरकारला सर्वतोपरी मदत केली जात आहे. मदत आणि बचावकार्यात राज्य सरकारशी समन्वय ठेवून शक्य ती सर्व मदत आणि आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन अमित शहा यांनी यावेळी दिले. हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १९७ जण बेपत्ता आहेत. यामध्ये बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातून १३९ जण, ऋषी गंगा प्रकल्पातील ४६ जण आणि १२ ग्रामस्थांचा समावेश आहे, असे ते म्हणाले.