नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून सेवा सप्ताहचे आयोजन करण्यात येत आहे. या सेवा सप्ताहची सुरुवात भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान(एम्स) मध्ये रुग्णालयात जाऊन रुग्णांसोबत बातचीत केली आणि फळे वाटून केली.
यावेळी अमित शाह यांच्यासोबत भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा सुद्धा उपस्थित होते. त्यांनी एम्समध्ये स्वच्छता अभियान सुद्धा राबविले. त्यांच्यासोहत केंद्रीय मंत्री विजय गोलय आणि दिल्लीचे आमदार विजेंद्र गुप्ता उपस्थित होते.
17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने 14 ते 20 सप्टेंबरपर्यंत सेवा सप्ताहचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी अमित शाह यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले संपूर्ण जीवन देशाची सेवा आणि गरिबांसाठी काम करण्यासाठी समर्पित केले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचा वाढदिवस सेवा सप्ताहचे आयोजन करुन साजरा करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे.