नवी दिल्ली - देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली आणि 'नमोपर्व 2.0' ची सुरुवात झाली. मंत्रिमंडळाचा गुरुवारी शपथविधी पार पडल्यानंतर लगेचच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्यांचे वाटप केले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. अमित शहा यांनी शनिवारी (1 जून) केंद्रीय गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. राजनाथ सिंह यांच्याकडून शहा यांनी गृहमंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे.
गृहमंत्री झाल्याने अमित शहा यांचा समावेश 'कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी'मध्ये होणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल अशी चौकडी एकत्र काम करू शकणार आहे. भाजपाच्या अजेंड्यातील अनेक मुख्य मुद्दे हे गृहखात्याशी संबंधित आहेत. मग, तो अयोध्येतील राम मंदिराचा विषय असो किंवा 370 कलम रद्द करण्याचा. त्या संदर्भात मोदी सरकार-2 ला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मोदींनी आपला अत्यंत विश्वासू शिलेदार गृहमंत्री म्हणून निवडला आहे.
मोदींनी गृहमंत्री म्हणून अमित शहांना का निवडलं?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले शिलेदार गुरुवारी निवडले. राष्ट्रपती भवनातील शानदार सोहळ्यात या सर्वांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर मोदी सरकार - 2 चं बहुचर्चित खातेवाटप जाहीर झालं. सगळ्यांच्या नजरा ज्यांच्यावर खिळल्या होत्या, त्या अमित शहा यांच्याकडे महत्त्वाच्या गृहखात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अमित शहा यांना गुजरातच्या गृहमंत्रिपदाचा अनुभव आहे. धडाकेबाज गृहमंत्री अशीच त्यांची तेव्हा ओळख होती. सध्या देशात नक्षलवादाची मोठी समस्या आहे. तिच्याशी दोन हात करताना शहांसारखा कणखर गृहमंत्री महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, असा विचारही मोदींनी केला असावा. राष्ट्रीय नागरिक नोंदणी, पूर्वोतर राज्यातील अशांतता, जम्मू आणि काश्मीरमधील सध्याची परिस्थिती हे देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर विषय आहेत. मोदी-शहा जोडीची व्हेव्हलेन्थ, विचार जुळत असल्यानं ते या विषयांवर रोखठोक भूमिका घेऊ शकतात.
राजनाथ सिंह यांनी संरक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला तर नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषीमंत्री, ग्राम विकास आणि पंचायत राज पदाचा पदभार स्वीकारला आहे.
नमोपर्व 2.0 : मोदींच्या कॅबिनेटमधील 91 टक्के मंत्री करोडपती
मोदींच्या कॅबिनेटमधील 56 मंत्र्यांपैकी 51 मंत्री हे करोडपती आहे. तर 22 जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती आता समोर आली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे. एडीआर या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा आणि राज्यसभा यातील सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक मंत्र्यांकडे जवळपास 14.72 कोटींची संपत्ती आहे. तर गृहमंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि अकाली दलाच्या हरसिमरत कौरबादल यांच्यासह चार मंत्र्याकडे 40 कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांची सून आणि अकाली दल प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल या सर्वात श्रीमंत मंत्री आहेत.