Amit Shah Tamil Nadu Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी बुधवारी(दि. 26) तामिळनाडूतील एमके स्टॅलिन सरकारवर जोरदार टीका केली. केंद्राकडून अन्याय होत असल्याचा आरोप स्टॅलिन यांच्याकडून होत आहे, मात्र शाहांनी या आरोपांचे खंडन केले आणि अशा आरोपांना लक्ष वळवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. केंद्र सरकारने 2014-24 या कालावधीत राज्याला 5,08,337 कोटी रुपये दिल्याचा दावाही केला.
स्टॅलिन यांच्या आरोपांचे खंडनतामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केंद्र सरकारवर शिक्षणाचे राजकारण केल्याचा आणि राज्याचा महत्त्वाचा निधी रोखल्याचा आरोप केला आहे. या आरोपांवर बोलातना शाहांनी स्टॅलिन यांच्यावर सीमांकनाबाबत चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला आणि या विषयावरील अटकळांना पूर्णविराम दिला. तसेच, सीमांकन प्रो-रेटा आधारावर केले जाते, तेव्हा तामिळनाडूसह दक्षिणेकडील कोणत्याही राज्यात संसदीय प्रतिनिधित्व कमी होणार नाही, असेही स्पष्टपणे सांगितले.
तामिळनाडूत देशविरोधी प्रवृत्ती शिखरावरराज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अपयशाबद्दल सत्ताधारी डीएमके सरकारवर टीका करताना शाह म्हणाले, तामिळनाडूमध्ये देशविरोधी प्रवृत्ती शिगेला पोहोचली आहे. तामिळनाडू सरकारने 1998 बॉम्बस्फोटातील आरोपी आणि मास्टरमाइंड (एसए बाशा) च्या शेवटच्या प्रवासादरम्यान सुरक्षा पुरवली होती. राज्यात अंमली पदार्थांची विक्री करण्यात ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट सुरू असून, अवैध खाण माफिया येथील राजकारणाला भ्रष्ट करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
द्रमुक नेत्यांना भ्रष्टाचारात पदवीसर्व द्रमुक नेत्यांकडे भ्रष्टाचारात पदव्युत्तर पदवी आहे. राज्यातील लोक अनेक मुद्द्यांवर नाराज असताना मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र (उदयनिधी) यांनी जनतेचे लक्ष वळवण्यासाठी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. ते सीमांकनाबाबत बैठक घेऊन दक्षिणेवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असे सांगत आहेत. पण, मोदी सरकारने लोकसभेत हे स्पष्ट केले आहे की, सीमांकनानंतर दक्षिणेकडील कोणतेही राज्य एकही जागा गमावणार नाही. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) सत्ता येईल आणि हा विजय महाराष्ट्र आणि हरियाणामधील भाजपच्या विजयापेक्षा मोठा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.