नवी दिल्ली - भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर, महाराष्ट्रातील नेत्यांना घेऊन फडणवीस यांनी अमित शहांसोबत बैठकही केली. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीपुढे पुढील असणाऱ्या एफआरपी, कजांचे पुनर्गठन, थकबाकी, बंद असलेले सहकारी कारखाने, इथेनॉलनिर्मिती अशा अनेक प्रश्नांसदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे.
बैठकीत एफआरपी पेक्षा जास्त दर दिल्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना इन्कमटॅक्सच्या आलेल्या नोटीसा यासंदर्भात मार्ग काढण्यावर सकारात्मक चर्चा झाली, एकूणच सहकार उद्योगाला उर्जितावस्था व आत्मविश्वास देण्याचे अमित शहा यांनी सुचोवात केले. त्यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखेपाटील, हर्षवर्धन पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. राहुल कुल, खा.धनंजय महाडीक, पृथ्वीराज देशमुख, मदन भोसले आदी महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते.
या बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळेल, असे अनेक निर्णय त्यात घेण्यात आले आहेत. एफआरपीपेक्षा अधिक पैसे देणार्या कारखान्यांच्या प्राप्तीकरासंदर्भातील काही प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघावा, अशी प्रमुख मागणी आम्ही केल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. दरम्यान, केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्याकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.