नवी दिल्ली : जम्मू भागात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटना आणि अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेबाबत आज गृहमंत्रालयात उच्चस्तरीय बैठक होणार आहे. ही बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत. नॉर्थ ब्लॉकमध्ये सकाळी ११ वाजता होणाऱ्या या बैठकीत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल, एनएसए अजित डोवाल, गृह सचिव, आयबी प्रमुख, रॉ प्रमुख, एनआयएचे डीजी, सर्व निमलष्करी दलांचे डीजी, लष्कर आणि हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि गृह मंत्रालयाचे इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत आयबी आणि रॉ प्रमुख सध्याच्या गुप्तचर अहवालाची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना देतील. याचबरोबर, या बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत ज्या पद्धतीने दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्या मुद्द्यावरही चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद पूर्णपणे संपवण्यासाठी इंटिग्रेटेड प्लॅन (एकात्मिक योजना) आखला जाऊ शकतो. याशिवाय, अमरनाथ यात्रेसाठी कडेकोट बंदोबस्तात करण्यात येणार आहे, यासाठी या बैठकीत आवश्यक सैन्य आणि उपकरणांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच अमरनाथ यात्रेच्या मार्गावर कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून एआयद्वारे देखरेख केली जाणार आहे.
शुक्रवारीही झाली बैठक याआधी शुक्रवारीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला गृह मंत्रालयाचे अनेक अधिकारी तसेच जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीजीपी, सीआरपीएफचे उच्च अधिकारी आणि गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी गृहमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षा व्यवस्थेबाबत काही प्रश्न विचारले आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. दरम्यान, या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू हल्ल्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह तेथील सुरक्षेबाबत सातत्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये चार दिवसांत चार दहशतवादी हल्लेजम्मू-काश्मीरच्या रियासी, कठुआ आणि डोडामध्ये गेल्या चार दिवसांत चार दहशतवादी घटना घडल्या. या दहशतवादी हल्ल्यांमुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्याला भारतीय सुरक्षा दलाचे जवान सुद्धा प्रत्युत्तर देत आहेत. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी कठुआमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. उर्वरित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.