नवी दिल्ली- देशभरात आज 72व्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावून देशाला संबोधित केलं आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शाहांनीही पक्ष कार्यालयात तिरंगा फडकावला आहे. परंतु तिरंगा फडकवत असताना अमित शाहांबरोबर एक घटना घडली. तिरंगा फडकावण्यासाठी जेव्हा त्यांनी दोरी खेचली होती, त्यावेळी अचानक तिरंगा खाली पडला. त्यानंतर काँग्रेसनं त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत अमित शहांवर निशाणा साधला.व्हिडीओ ट्विट करत काँग्रेस म्हणाली, ज्यांना देशाचा झेंडा सांभाळता येत नाही, ते देश कसा सांभाळणार आहेत ?, 50 वर्षांहून अधिक काळ तिरंग्याचा तिरस्कार केला नसता, तर ध्वजाचा असा अपमान झाला नसता. दुस-यांना देशभक्तीचं सर्टिफिकेट वाटणा-यांना राष्ट्रगीताचा अर्थ तरी माहीत आहे का?, असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्र्यांनी स्वतःच्या निवासस्थान, पक्ष कार्यालयात ध्वजारोहण केलं आहे.
ध्वजारोहण करताना अमित शहांकडून पडला 'तिरंगा', काँग्रेस बोलली हे काय देश सांभाळणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 12:15 PM