नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेची निवडणूक होईपर्यंत भाजपचे अध्यक्षपद अमित शहा यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे.याचवेळी महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. अमित शहा गेल्या पाच वर्षांपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळीत आहेत. या काळात भाजपची सर्वाधिक राज्यांमध्ये सत्ता आली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात या राज्यांमध्ये भाजप १७ राज्यांमध्ये सत्तेत आली आहे. राजकीय ‘चाणक्य’ म्हणून अमित शहा यांची अमीट छाप देशाच्या राजकारणावर उमटली आहे. परंतु गृहमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर ‘एक व्यक्ती-एक पद’ या भाजपतील नियमानुसार अमित शहा यांना राष्ट्रीय अध्यक्षपद सोडावे लागणार आहे.
नेतृत्व कायम ठेवण्याची मागणीअमित शहा यांच्या अध्यक्षपदाची मुदत येत्या नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे. तोपर्यंत अमित शहा यांच्याकडेच भाजपचे नेतृत्व ठेवावे. या काळात महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या राज्यांच्या निवडणुकाही होणार आहेत.
या निवडणुका झाल्यानंतर रीतसरपणे नव्या अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पुढील पाच महिने अमित शहा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता आहे.