तुम्ही राहुल गांधींना 'पप्पू' नाही म्हणू शकत; अमित शहांनी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 09:09 PM2023-02-08T21:09:15+5:302023-02-08T21:09:22+5:30
Amit Shah Statement: काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या भाषणादरम्यान 'पप्पू' शब्दाचा उल्लेख केला होता.
Amit Shah in Lok Sabha: बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (adhir ranjan chowdhury) यांना 'पप्पू' शब्दावरुन सल्ला दिला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारवर टीका केली आणि देशाचे आर्थिक धोरण, चिनी सैन्याने केलेले अतिक्रमण आणि न्यायालयावर दबाव आणल्याचा आरोप केला.
आपल्या भाषणादरम्यान, अधीर रंजन चौधरी यांनी मंगळवारी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भाषणाचे कौतुक केले आणि म्हणाले की, हे लोक (भाजप) राहुल गांधींना पप्पू सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांनी (राहुल गांधी) तुम्हालाच (भाजप) पप्पू सिद्ध केले. यावर अमित शहा यांनी तात्काळ आक्षेप घेतला. अधीर रंजन चौधरी यांच्या भाषणाचा खरपूस समाचार घेत अमित शहा म्हणाले की, तुम्ही सन्माननीय खासदारांना पप्पू म्हणू शकत नाहीत.
यापूर्वी दोन्ही नेत्यात वाद
यापूर्वी अमित शाह आणि अधीर रंजन चौधरी यांच्यात चिनी लष्कराच्या अतिक्रमणाच्या आरोपावरुन अनेकदा वाद झाला होता. अधीर रंजन चौधरी यांनी 1962 मध्ये चीनशी झालेल्या युद्धाच्या निमित्ताने अटलबिहारी वाजपेयींच्या मागणीवर जवाहरलाल नेहरुंनी सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली होती, असे नमूद करून मोदी सरकार आज चीनच्या अतिक्रमणावर सभागृहात चर्चाही करत नाही, असे म्हटले.
त्यावर प्रत्युत्तर देताना अमित शहा म्हणाले की, त्यावेळी काही त्रुटी होत्या, यावेळी काही त्रुटी नाहीत. देशातील हजारो एकर जमीन गमावून त्यावेळचे सरकार आले होते. यानंतरही अनेक अहवालांचा हवाला देत अधीर रंजन भारतीय भूमीवर चीनच्या अतिक्रमणाबाबत बोलत राहिले. यावर पुन्हा एकदा तीव्र आक्षेप नोंदवत अमित शहा सभागृहात उभे राहिले आणि म्हणाले की, सभागृहात जे काही बोलले जाते ते रेकॉर्डवर घेतले जाते. अशा गोष्टी सभागृहात गांभीर्याने बोलावे.