केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आसाम दौऱ्यावर होते. यावेळी अमित शहा यांनी म्यानमार सीमेबाबत मोठी घोषणा केली. 'भारतामध्ये म्यानमारच्या सीमेवर कुंपण उभारले जाईल, जेणेकरून भारतामध्ये विना अडथळा होणारा संचार प्रतिबंधित होईल',अशी घोषणा शाह यांनी केली. आसाम पोलीस कमांडोंच्या पासिंग आऊट परेडसाठी अमित शाह उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
अमित शाह म्हणाले की, "बांगलादेशला लागून असलेली सीमा जशी सुरक्षित केली जात आहे तशीच भारताची म्यानमारशी असलेली सीमा सुरक्षित केली जाईल." गेल्या तीन महिन्यांत म्यानमार लष्कराचे सुमारे ६०० सैनिक भारतात दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम म्यानमारमधील राखिन राज्यातील अरकान आर्मी या वांशिक सशस्त्र गटाच्या अतिरेक्यांनी मिझोरामच्या लांगतलाई जिल्ह्यात आश्रय घेतला आहे.
सीमेवर कंपाऊंड घेऊन भारत दोन्ही देशांमधील फ्री मूव्हमेंट रेजिम बंद करणार आहे. यासोबतच सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना दुसऱ्या देशात जाण्यासाठी लवकरच व्हिसाची गरज भासणार आहे. भारत-म्यानमार सीमेवर राहणाऱ्या लोकांमधील कौटुंबिक आणि वांशिक संबंधांमुळे १९७० च्या दशकात एफएमआर आणण्यात आले आहे.