नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी कर्नाटक दौऱ्यावर होते. त्यांनी बिदर जिल्ह्यात एका निवडणूक सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या लोकांचे आभार मानले. तसेच, आपल्या भाषणादरम्यान, काँग्रेसवरही जोरदार हल्लाबोल केला. 'ईशान्येत काय घडलं, हे तुम्हा सर्वांना माहित आहे. त्रिपुरा, नागालँड, मेघालयचे निकाल जाहीर झाले अन् या तिन्ही राज्यांतून काँग्रेसचा सुपडा साफ झाला. नागालँडमध्ये काँग्रेसला 0, मेघालयात 3 आणि त्रिपुरामध्ये फक्त 4 जागा मिळाल्या. आता दुर्बिणीतून पाहिलं तरी ते कुठे दिसत नाहीत,' अशी टीका त्यांनी केली.
'ते म्हणायचे की, ईशान्येत भाजपचा प्रवेश होऊ शकत नाही. पण, तिथे एनडीएचे दुसऱ्यांदा सरकार स्थापन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू ईशान्येपासून गुजरातपर्यंत, उत्तर प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत आहे,' असंही शहा म्हणाले. विशेष म्हणजे, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपने आपल्या सहयोगींसह पुन्हा सत्ता मिळवली आहे. यावेळी भाजप मेघालयात एकट्याने लढले आणि 2 जागा जिंकण्यात यशस्वी झाले. एनपीपीचे अध्यक्ष कोनराड संगमा यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. भाजपने त्यांचा पक्ष एनपीपीला पाठिंबा दिल्याचेही त्यांनी सांगितले.
अमित शहा पुढे म्हणाले की, 'लवकरच विजय संकल्प रथयात्रा सुरू होणार असून ही यात्रा भाजपच्या विजय संकल्पाचे प्रतीक नसून गरीब जनतेच्या विजयासाठी, गरिबांच्या कल्याणासाठी आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची पातळी दिवसेंदिवस घसरत आहे. ते 'मोदी तेरी कबर खुदेगी'च्या घोषणा देत आहेत, आम आदमी पार्टीचे लोक 'मोदी तू मर' म्हणत आहेत. असे बोलून देव तुमचे ऐकणार नाही, कारण देशातील 130 कोटी जनता पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत,' असंही शहा म्हणाले.