बंगळुरू- कर्नाटक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अमित शाहांनी सिद्धरामय्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटकमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सिद्धरामय्या सरकारवर टीकेची झोड उठवतानाच चुकून येडियुरप्पा सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. भ्रष्टाचारासाठी जर कुठल्या सरकारला बक्षीस द्यायची वेळ आलीच, तर त्यासाठी येडियुरप्पा सरकार पात्र असे, असे अनवधानानं अमित शाह बोलून गेले आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अमित शाहांनी येडियुरप्पा सरकारवर टीका केल्यानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायाधीशांच्या विधानाचा हवाला देत अमित शाहा म्हणाले की, भ्रष्टाचारासाठी जर कुठल्या सरकारला बक्षीस द्यायचं झालंच तर येडियुरप्पांचं सरकार त्यासाठी पात्र असेल. त्यानंतर लागलीच चूक झाल्याचं लक्षात येताच बाजूच्यांनी त्यांना सूचक इशारा केला. शेजारील व्यक्तीनं चूक निदर्शनास अमित शाहांनी यू-टर्न घेत सिद्धरामय्या सरकारवर टीका केली. या संधीचा फायदा घेत सिद्धरामय्या यांनीही अमित शाहांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. सिद्धरामय्या यांनी ट्विट करत शाह यांचे आभार मानले. तुम्ही सत्य बोललात असं म्हणत त्यांनी शाहांवर उपरोधिक टीका केलीय.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. त्यानुसार 12 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. संपूर्ण निवडणूक एकाच टप्प्यात पार पडेल. त्यानंतर 15 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. या निवडणुकीत 4 कोटी 96 लाख नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीत ईव्हीएम मशिन्ससोबतच व्हीव्हीपॅट मशिन्सचाही वापर होणार आहे.
कर्नाटक हे काँग्रेसची सत्ता असलेल्या देशातील मोजक्या राज्यांपैकी एक आहे. त्यामुळे काँग्रेसच्यादृष्टीने ही अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. तर आपल्या काँग्रेसमुक्त भारत या ध्येयाच्या आणखी जवळ जाण्यासाठी या निवडणुकीत भाजपाकडून संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे. याशिवाय, या निवडणुकीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मुव्हमेंटम सेट होण्याची शक्यता आहे. अशा अनेक अर्थांनी कर्नाटक विधानसभेची निवडणूक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.