लखनऊ - आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे तसा निवडणुकीचं वातावरणात रंग चढू लागलेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाआधी उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनऊमध्ये भाजपाच्या बैठकांचे सत्र सुरु झालंय. उत्तर प्रदेशात मागील निवडणुकीच्या वेळी भाजपाला 70 हून अधिक जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्या जागा राखणे भाजपासाठी मोठं आव्हान बनलं आहे.
सत्ताधारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत युपीच्या भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरु होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी बैठकीत चर्चा झाली. भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरुच होती. यामध्ये अमित शहा यांनी उत्तर प्रदेशातील सध्याच्या राजकीय घडामोडींची माहिती घेतली.तसेच भाजपाची उत्तर प्रदेशात काय तयारी आहे यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत मुख्यत: समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या आघाडीबाबत आणि काँग्रेसच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, केशव प्रसाद मोर्य, उत्तर प्रदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडेय, सुनील बंसल आणि जिल्हाध्यक्ष आणि लोकसभा प्रचार प्रभारी यांचा समावेश होता.
उत्तर प्रदेशात येणाऱ्या 17 लोकसभा मतदारसंघावर भाजपाने विशेष लक्ष दिले आहे. यामध्ये धारहरा, बहराईच, सीतापूर, हरदोई, मिसारिख, बाराबंकी, केसरगंज, श्रावास्ती, गोंडा, फैजाबाद, आंबेडकरनगर, सुलतानपूर, अमेठी, रायबरेली आणि लखनऊ अशा मतदारसंघाचा समावेश आहे. अमेठी येथून राहुल गांधी तर रायबरेली येथून सोनिया गांधी निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. त्यामुळे बैठकीत यावर देखील चर्चा करण्यात आली.
उत्तर प्रदेशातून लोकसभेसाठी सर्वाधिक 80 जागा येतात. त्यामुळे यातील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपा डाव आखत आहे. मात्र समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी यांनी निवडणुकीत एकत्र येत आघाडी केल्याने सपा-बसपा आघाडी भाजपासाठी डोकेदुखी ठरत आहे असं चित्र सध्या उत्तर प्रदेशच्या राजकारणात दिसत आहे.