पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार टक्कर सुरु आहे. कोलकातामध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या सभास्थळी सभेआधीच बंगाल पोलिसांनी जात परवानगीचे कागदपत्र मागितले. मात्र, कागदपत्र ने देऊ शकल्याने थेट सभामंडप तोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे भाजपाचे कार्यकर्ते सभा स्थळी जमले असून तणावाचे वातावरण आहे.
सातव्या टप्प्यात लोकसभेच्या उत्ती कोलकाता मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी शहा आले आहेत. येथे त्यांचा रोड शो देखिल होणार आहे. जय श्री राम म्हणत मी कोलकातामध्ये येत आहे, हिंमत असेल तर ममता यांनी अटक करून दाखवावी असे आव्हान शहा यांनी काल दिले होते.
भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. हा प्रकार धक्कादायक आहे. भाजपाच्या अध्यक्षांची रॅली होऊच नये यासाठी ममता सरकार कोणतीच कसर सोडत नाहीय. स्वागत मंचही उभारलेला तोडायला लावला आहे. एवढेच नाही तर रस्त्याशेजारील दोन्ही बाजुंना लावलेले फुगे आणि फलकही काढून टाकले आहेत. राजकीय वैर खूप महागात पडेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
तसेच एका ट्विटमध्ये त्यांनी अमित शहा यांच्या प्रचारसभेमध्ये अडचणी घातल्या जात आहेत. ममता यांचे सरकार भाजपाला त्रास द्यायचा प्रयत्न करत आहे. यासाठी प्रशासनाला सोडले आहे. लाऊडस्पीकर लावण्यावरून पोलिस त्रास देत आहेत. ही निवडणूक आचारसंहिता आहे की ममता यांचा हट्ट, असा सवाल उपस्थित केला आहे.