भारत आणि कॅनडामधील तणाव आता पुढच्या पातळीवर पोहोचला आहे. भारताने कॅनडाच्या सहा उच्चायुक्तांची हकालपट्टी केली असून देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कॅनडातील भारतीय दुतावासाच्या अधिकाऱ्यांना परत मायदेशी येण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे भारत वि. कॅनडा वाद वाढण्याची शक्यता असतानाच कॅनडाने निज्जर हत्याकांडात भारताचे गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. कॅनडाने गेल्याच आठवड्यात एनएसए अजित डोवालांसोबत गुप्त बैठक घेतल्याचीही दावा केला जात आहे.
कॅनडाचे परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी भारतीय उच्चायुक्त आणि सहा राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्याच्या कारवाईवर वक्तव्य केले आहे. हे सर्वजण कॅनडाच्या नागरिकांच्या टार्गेट किलिंगमध्ये सहभागी होते, असा आरोप जोली यांनी केला आहे. तसेच तपासात भारताने सहकार्य केले नसल्याचाही आरोप केला आहे.
वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक बातमी छापून आली आहे. यामध्ये अमित शाह यांचे नावही घेण्यात आले आहे. या कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी भारत सरकारचा यामागे हात असल्याचे आरोप केले आहेत. जेव्हा हा अहवाल लिहिला गेला तेव्हा अमित शाह यांचे नाव नव्हते. ते नंतर घुसडण्यात आले आहे. कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो, पोलीस आणि मंत्री भारताविरोधात वक्तव्ये करू लागले आहेत.
या अहवालावरून वॉशिंग्टन पोस्टने बातमी केली आहे. यामध्ये निज्जरची हत्या ही वेगळी घटना नव्हती तर भारताच्या वरिष्ठ अधिकारी आणि रॉने घडविलेल्या कारस्थानाचा भाग होती असे म्हटले आहे. आम्हाला माहिती आहे की हे लोक निज्जर हत्या, अन्य लोकांच्या हत्या आणि कॅनडामध्ये सध्या सुरु असलेल्या हिंसाचारात सहभागी आहेत, असे एका वरिष्ठ कॅनडा अधिकाऱ्याने म्हटले आहे.
अमित शाह यांच्याबद्दल दावे काय...
हे भारतीय राजनैतिक अधिकारी खलिस्तानी दहशतवाद्यांची गोपनिय माहिती काढत होते. याचा वापर रॉ करत होती, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही माहिती भारताच्या टॉपच्या अधिकाऱ्याला दिली जात होती. राजनैतीक अधिकाऱ्यांच्या चर्चेत व मेसेजमध्ये भारताचा वरिष्ठ अधिकारी आणि रॉच्या एका अधिकाऱ्याचा उल्लेख आहे, असा दावा कॅनडाने केला आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्याची ओखळ कॅनडाई अधिकाऱ्यांनी पटविली असून याचे नाव अमित शाह आहे, असे यात म्हटले आहे. हा अधिकारी मोदींचा जवळचा आहे, गृह मंत्री म्हणून काम करतो, असे यात म्हटले आहे. कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी एनएसए अजित डोवाल यांना शनिवारी सिंगापूरमध्ये झालेल्या एका सिक्रेट मिटिंगमध्ये अमित शाह आणि अन्य पुराव्यांची माहिती दिल्याचाही दावा करण्यात आला आहे.