ऑनलाइन लोकमत -
गांधीनगर, दि. 8 - विजय रुपानी यांनी रविवारी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी 25 मंत्र्यांना राज्यमंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. विजय रुपानी यांच्या शपथविधीला दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे असणारे नितीन पटेल यांनीदेखील यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गुजरातच्या राज्यमंत्रिमंडळावर भाजपाध्यक्ष अमित शहा यांची छाप असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. मंत्रिमंडळातील जातीय आणि क्षेत्रीय समीकरण पाहता अमित शाह 2017 विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत असल्याचं दिसत आहे.
एक कॅबिनेट आणि सात राज्यमंत्रीसह एक तृतीयांशा मंत्र्यांना मिळालेली ही पहिलीच संधी आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांना सरकारी कामकाजाचा 20 महिन्यांनहून जास्त अनुभव नाही. यावरुन लक्षात येतं की गुजरातच्या कारभारावर प्रधानमंत्री कार्यालय आणि अमित शहा यांची पकड असणार आहे. आनंदीबेन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सौरभ पटेल, रमनलाल वोरा, मंगूभाई पटेल आणि वसूबेन त्रिवेदी सारख्या दिग्गज नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त गेल्या सरकारमधील तीन कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांनादेखील वगळण्यात आलं आहे.
अर्थ आणि ऊर्जामंत्री सौरभ पटेल यांना वगळण्याचा निर्णय सर्वात जास्त आश्चर्यकारक मानला जात आहे. कारण 2002 मध्ये मोदींच्या विजयानंतर आतापर्यंत प्रत्येकवेळा त्यांना मंत्रीपद मिळालं आहे. गुजरातच्या ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीतमध्ये पटेल यांचं खूप योगदान आहे. सौरभ पटेल हे अमित शहा आणि आनंदीबेन पटेल यांच्या निकट नव्हते. विकास पटेल यांचे अंबानी कुटुंबासोबत असलेल्या संबंधांमुळे त्यांना वगळण्यात आल्याची चर्चा आहे. कारण आम आदमी पक्ष गुजरातमध्ये त्यांच्याविरोधात आक्रमक भुमिका घेण्याची तयारी करत आहे.
गुजरातेत २०१७ अखेर विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रूपानी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळात जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते. पटेल समुदायाच्या ८ नेत्यांचा, ओबीसीच्या ८, क्षत्रिय समुदाच्या तीन, आदिवासी समुदायाच्या दोन, तर ब्राह्मण, जैन, सिंधी आणि दलित समुदायाच्या प्रत्येकी एक-एक नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. विजय रूपानी हे गुजरातचे नववे मुख्यमंत्री आहेत. विशेष म्हणजे सौराष्ट्र, उत्तर, दक्षिण व मध्य गुजरातला प्रतिनिधित्व देण्यात आले. नरोडा येथील आमदार निर्मला वधवानी या मंत्रिमंडळात एकमेव महिला सदस्य आहेत. मंत्रिमंडळात ८ कॅबिनेट, तर १६ राज्यमंत्री आहेत. उ महात्मा मंदिर येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याला भाजपाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री हर्ष वर्धन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास, हरियाणाचे मनोहर लाल खट्टर, आनंदीबेन पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या मंत्र्यांना वगळले : आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळात असलेले रजनीभाई पटेल, वसुबेन त्रिवेदी, सौरभ पटेल, गोविंद पटेल, छत्रसिंह मोरी, ताराचंद छेडा आणि कांतीभाई गमीत यांना वगळण्यात आले आहे. ३ आॅगस्ट रोजी आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिला होता.
८ कॅबिनेट मंत्री : नितीन पटेल, भूपेंद्रसिंह चुडासामा, गणपत वसवा, बाबू बोखिरिया, दिलीप ठाकूर, जयश रादादिया, चिमण सपारिया आणि आत्मराम परमार.