नवी दिल्ली - केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मुलाच्या कंपनीच्या उलाढालीत तब्बल 16 हजार पटीने वाढ झाल्याचे आरोप भारतीय जनता पक्षाने फेटाळून लावले आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत हे आरोप निराधार आणि प्रतिमा मलिक करण्यासाठी करण्यात आल्याचे सांगितले. तसेच कंपनीच्या नफ्यात 16 हजार पटींनी वाढ झाल्याचा उल्लेख सनसनाटी वाढवण्यासाठी करण्यात आला आहे. हे वृत्त प्रसारिक करणारे संकेतस्थळ, त्याचे संपादक आणि संबंधित लेखकाविरोधात अमित शहांचा मुलगा जय शाह हे 100 कोटींचा मानहानीचा खटला आणि फौजदारी खटला दाखल करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. द वायर या संकेतस्थळाने जय शाह यांच्या कंपनीच्या नफ्यात 16 हजार पटींनी वाढ झाल्याचे वृत्त प्रसारित केले होते. त्यानंतर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अमित शाहांवर निशाणा साधला होता. 2014चं सरकार बदलल्यानंतर अमित शाह यांच्या मुलाचंही नशीब फळफळलं आहे, असा आरोप काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला होता. सिब्बल यांच्या मते, अमित शाह यांच्या मुलाची कंपनी टेम्पल इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड मार्च 2013मध्ये तोट्यात होती. त्यावेळी कंपनीला 6,239 रुपयांचं नुकसान झाल्याचं दाखवण्यात आले होते. तसेच मार्च 2014मध्येही कंपनीला 1724 रुपयांचा तोटा झाला होता. परंतु 2014-15नंतर कंपनीला मोठा फायदा झाल्याचे समोर आले. मे 2014नंतर कंपनीनं मोठ्या प्रमाणात प्रगती केली असून, त्या आर्थिक वर्षात कंपनीला 18,728 रुपयांचा फायदा झाला आहे. कंपनीचा एकूण महसूल फक्त 50 हजार रुपये होता. मात्र खरा बदल हा 2015-16नंतर घडला आहे. 2015-16च्या आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल 80 कोटी झाली. एका वर्षात कंपनीच्या उलाढालीत 16 हजार पटीनं वाढ झाली. 2014नंतर कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा होऊ लागला. तसेच राजीव खांडेलवाल नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या फायनान्शियल कंपनीतर्फे टेम्पल इंटरप्रायजेसला 15.78 कोटी रुपयांचे कर्ज दिले, असा आरोप कपिल सिब्बल यांनी केला. ऑक्टोबर 2016मध्ये टेम्पल इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बंद झाली. आणि कंपनी तोट्यात असल्यानं बंद केल्याची कारण सांगण्यात आले. या प्रकरणावरून कपिल सिब्बल यांनी अमित शाह यांना लक्ष्य केले. कपिल सिब्बल म्हणाले, काँग्रेसवर 10 लाखांच्या घोटाळ्याचा आरोप जरी झाला तरी त्याच्या मागे सीबीआय व ईडीचा ससेमिरा लावतात. दीर्घकालीन भांडवलशाहीचा त्यांच्यावर आरोप करण्यात येतो. वीरभद्र सिंह यांच्यावर किती केसेस लादण्यात आल्या होत्या.