नवी दिल्ली - भाजपाध्यक्ष अमित शाह मुलाच्या कंपनीवरून वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता आहे. पुत्र जय शाह यांच्या कंपनीच्या उलाढालीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे काँग्रेसनं अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे. तसेच या प्रकरणावरून काँग्रेसनं अमित शाह यांच्यासोबत नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे.2014चं सरकार बदलल्यानंतर अमित शाह यांच्या मुलाचंही नशीब फळफळलं आहे, असा आरोप काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे. सिब्बल यांच्या मते, अमित शाह यांच्या मुलाची कंपनी टेम्पल इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड मार्च 2013मध्ये तोट्यात होती. त्यावेळी कंपनीला 6,239 रुपयांचं नुकसान झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. तसेच मार्च 2014मध्येही कंपनीला 1724 रुपयांचा तोटा झाला होता. परंतु 2014-15नंतर कंपनीला मोठा फायदा झाल्याचं समोर आलं आहे. मे 2014नंतर कंपनीनं मोठ्या प्रमाणात प्रगती केली असून, त्या आर्थिक वर्षात कंपनीला 18,728 रुपयांचा फायदा झाला आहे. कंपनीचा एकूण महसूल फक्त 50 हजार रुपये होता. मात्र खरा बदल हा 2015-16नंतर घडला आहे. 2015-16च्या आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल 80 कोटी झाली आहे. एका वर्षात कंपनीच्या उलाढालीत 16 हजार पटीनं वाढ झाली आहे.2014नंतर कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा होऊ लागला. तसेच राजीव खांडेलवाल नावाच्या व्यक्तीनं स्वतःच्या फायनान्शियल कंपनीतर्फे टेम्पल इंटरप्रायजेसला 15.78 कोटी रुपयांचं कर्ज दिलं, असा आरोप कपिल सिब्बल यांनी केला आहे. ऑक्टोबर 2016मध्ये टेम्पल इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बंद झाली. आणि कंपनी तोट्यात असल्यानं बंद केल्याची कारण सांगण्यात आलं. या प्रकरणावरून कपिल सिब्बल यांनी अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे. कपिल सिब्बल म्हणाले, काँग्रेसवर 10 लाखांच्या घोटाळ्याचा आरोप जरी झाला तरी त्याच्या मागे सीबीआय व ईडीचा ससेमिरा लावतात. दीर्घकालीन भांडवलशाहीचा त्यांच्यावर आरोप करण्यात येतो. वीरभद्र सिंह यांच्यावर किती केसेस लादण्यात आल्या.मी विचारतो अमित शाहांच्या मुलाच्या नावे असलेल्या कंपनीनं केलेल्या घोटाळ्यानंतर आता सीबीआय, ईडी कुठे आहेत, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा कुठे आहेत?, त्याप्रमाणेच कपिल सिब्बल यांनी अमित शाह यांच्या मुलाच्या नावे असलेल्या दुस-या कंपनीवरही गंभीर आरोप केले आहे. कुसुम फिनसर्व या दुस-या एका कंपनीतही जय शाह यांचे 60 टक्के शेअर्स आहेत. या कंपनीलासुद्धा राजेश खंडेलवाल यांनी कर्ज दिलं होतं. कंपनीत घोटाळा झाला आहे किंवा नाही, हे चौकशीअंती समोर येईल, आम्ही फक्त चौकशीची मागणी करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कंपनीची चौकशी करणार आहेत का ?, पंतप्रधान हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरीत करणार आहेत का ?, जय अमित शाह याला कोण अटक करणार ?, असा प्रश्न सिब्बल यांनी मोदींना विचारला आहे. परंतु या सर्व प्रकरणात अमित शाह यांचे पुत्र जय शाह व त्यांच्या कंपनीकडून कोणताही खुलासा आलेला नाही.
अमित शाहांच्या मुलाच्या कंपनीला अच्छे दिन, संपत्तीत झाली 16 हजार पटींची वाढ, काँग्रेसचा सनसनाटी आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2017 3:49 PM
भाजपाध्यक्ष अमित शाह मुलाच्या कंपनीवरून वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता आहे. पुत्र जय शाह यांच्या कंपनीच्या उलाढालीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे काँग्रेसनं अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे.
ठळक मुद्देभाजपाध्यक्ष अमित शाह मुलाच्या कंपनीवरून वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता आहे. पुत्र जय शाह यांच्या कंपनीच्या उलाढालीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे काँग्रेसनं अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे.2015-16च्या आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल 80 कोटी झाली आहे. एका वर्षात कंपनीच्या उलाढालीत 16 हजार पटीनं वाढ झाली आहे.