हरीश गुप्ता/ लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक पार पडल्यानंतर आता राज्यसभेसाठी येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांवर साऱ्यांचे लक्ष लागले असून, गुजरात काँग्रेसमध्ये उलथापालथ करण्याची रणनीती भाजपा अध्यख अमित शहा यांनी आखल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गुजरात (३), पश्चिम बंगाल (६) आणि मध्यप्रदेशमधील (१) राज्यसभेच्या दहा जागांवर सद्या सर्वांचे लक्ष लागलेले आहे. याशिवाय उत्तरप्रदेशातील २ आणि आंध्रप्रदेशातील एका जागेवरही राज्यसभेची पोटनिवडणूक होणार आहे. तसेच, बसपाच्या प्रमुख मायावती यांनी दिलेला राजीनामा आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर व्यंकय्या नायडू यांची एक जागाही रिक्त होईल. पंरतू, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भाजपला राज्यसभेची जागा देतील का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर,भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे गुजरातमधील राज्यसभेच्या तीनही जागा मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल आणि माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांच्या भविष्याबाबत सद्या तर्क केले जात आहेत. येचुरी यांना पक्षाकडून तिसऱ्यांदा संधी दिली जाऊ शकते. गुजरातमध्ये काँग्रेसच्या ११ आमदारांनी भाजपसाठी क्रॉस वोटिंग केल्यानंतर अहमद पटेल यांच्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. गुजरात विधानसभेच्या १८२ सदस्यात भाजपचे १२३ सदस्य आहेत. राज्यसभेसाठी त्यांचे दोन उमेदवार विजयी होऊ शकतात. काँग्रेसचे ५६ सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे २ तर जनता दल यूनायटेडचा एक सदस्य आहे. या पक्षांच्या पाठिंब्याने काँग्रेसचा एक सदस्य राज्यसभेसाठी निवडून येऊ शकतो. परंतू, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना अतिरिक्त ११ मते मिळाली. तसेच, शंकरसिंह वाघेला यांनी पक्ष सोडला आहे. या घटनांमुळे आता परिस्थिती बदलली आहे. काही बदल होऊ शकतो का याची चाचपणी काँग्रेस करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे गुजरातमधील राज्यसभेच्या तीनही जागा मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. याबाबत मिळत असलेल्या माहितीवर जर विश्वास ठेवला तर, असे कळते की, सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हे या राजकीय घडामोडीत मागे जात आहेत. कारण, त्यांना असे वाटते की, यूपीए २ च्या काळातील पक्षाच्या दुरवस्थेला पटेल हेच जबाबदार आहेत. वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना पुन्हा राज्यसभेची संधी मिळू शकते. कारण, त्यांच्याकडे माहिती व प्रसारण मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार देऊन मोदी यांनी हे निश्चित केले आहे की, स्मृती इराणी यांना तिसऱ्यांदा राज्यसभेची संधी दिली जाणार आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत प्रचार करण्यासाठी भाजपमध्ये मजबूत प्रचारक असणारी दुसरी महिला नेता नाही. मध्य प्रदेशातून भाजपचे महासचिव राम माधव हे राज्यसभेसाठी इच्छुक आहेत. पण, प्रश्न असा आहे की, पक्षाचे अन्य एक महासचिव आणि राम माधव यांच्यापेक्षा वरिष्ठ असणारे मुरलीधर राव हे राज्यसभेत प्रवेश करण्याची प्रतीक्षा करत आहेत. आरएसएस आणि पक्षाचे विचारवंत एस. गुरुमूर्ती यांचे ते निकटवर्तीय आहेत. १८ मे रोजी भाजपचे केंद्रीय मंत्री अनिल दवे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झालेली आहे. उत्तरप्रदेशातून दोन जागांवर कुणाला संधी दिली जाऊ शकते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ही नावे निश्चित करु शकतात किंवा सूचवू शकतात. पश्चिम बंगालमध्ये जर सीताराम येचुरी यांना पक्षाने पुन्हा संधी दिली नाही तर काँग्रेस पक्ष कुठल्याही अडचणींशिवाय स्वत:चा उमेदवार देऊ शकतो. मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची अशी इच्छा आहे की, त्यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांना पक्षाने उमेदवारी द्यावी. पण, पक्ष नेतृत्व त्यासाठी राजी नसल्याचे दिसत आहे.
गुजरात काँग्रेसमध्ये उलथापालथ करण्याची अमित शहा यांची रणनीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 3:36 AM