ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 20 - आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर 21 जून रोजी देशभरात अनेक ठिकाणी योग कार्यक्रमांचे जोरदार आयोजन करण्यात येत आहे.
योगगुरु बाबा रामदेव यांनी सुद्धा गुजरातमधील अहमदाबादमध्ये योग शिबिराचे आयोजन केले आहे. यावेळी बाबा रामदेव म्हणाले की, योग केल्याने वजन कमी होते. याचे उदाहरण देताना भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी योगा करुन जवळपास 20 किलो वजन कमी केल्याचे त्यांनी सांगितले. जे लोक योगा शिकत नाहीत, पण, योगाला नावे ठेवतात. तसेच, योगाला खेळाचा दर्जा देत नाहीत, असे लोक याबाबतीत अज्ञान आहेत. अशा विचारांच्या लोकांना केव्हाही योगा म्हणजे काय, हे पटवून देऊ नये. ऑलिम्पिक खेळांमध्ये योगाचा समावेश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असेही, रामदेव बाबा म्हणाले.
योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही त्यांनी कौतुक केले. केवळ पंतप्रधान मोदीच योगींना मुख्यमंत्री करू शकतात, असे ते म्हणाले. एनडीएकडून रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याच्या निर्णयावरही त्यांनी भाष्य केले. कोविंद यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित करण्याचा निर्णय हा भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे, असेही रामदेव बाबा म्हणाले.
#Gujarat: Baba Ramdev holds Yoga camp in Ahmedabad ahead of #WorldYogaDay2017pic.twitter.com/ClNxdofz7l— ANI (@ANI_news) June 20, 2017
रामदेव बाबा यांना पाकिस्तानातील योग कार्यक्रम राबवायचा आहे, त्यासाठी त्यांनी पाकिस्तानात जाण्याची तयारीही दर्शवली आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानकडून मला योगा शिकवण्यासाठी निमंत्रण आले आहे. पाकिस्तानमधला प्रत्येक व्यक्ती हा दहशतवादी नाही. शेजारील देशांनाही योगा शिकवण्याची गरज आहे. मात्र, मला पाकिस्तानातल्या राजकीय अस्थिरतेची चिंता आहे. तरीही मी पाकिस्तानमध्ये जाणार आहे.
दरम्यान, अहमदाबादमध्ये चार दिवसांच्या योग शिबिराला सुरूवात करण्यात आली आहे.