दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना शाह म्हणाले, "PM नरेंद्र मोदी 2029 पर्यंत पंतप्रधान राहणार आहेत आणि अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे, 2029 नंतरही पंतप्रधान मोदीच भाजपचे नेतृत्व करतील." 'केजरीवाल यांना विशेष सूट दीली, असे मोठ्या प्रमाणावर लोकांना वाटते' -सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या अंतरिम जामीनासंदर्भात बोलताना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, "मला वाटते, हा काही नियमित निर्णय नाही. विशेष सूट देण्यात आली, असे या देशात मोठ्या प्रमाणावर लोकांना वाटते. ते सध्या (अरविंद केजरीवाल) आणखी एका प्रकरणात (स्वाती मालीवाल हल्ला) अडकलेले आहेत. त्यांना यातून मुक्त होऊ द्या, मग बघू काय होते ते."
दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी (10 मे) सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने, केजरीवाल यांन 2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागेल आणि पुन्हा तुरुंगात जावे लागेल, असे सांगितले होते. एवढेच नाही, तर न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना काही अटीही घातल्या आहेत.