कौन बनेगा करोडपतीमध्ये 50 लाख रुपये जिंकल्यानंतर प्रसिद्धीझोतात आलेल्या अमिता सिंह तोमर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मध्य प्रदेशातील श्योपूर येथील तहसीलदारपदाचा कार्यभार न दिल्याने नाराज झालेल्या अमिता यांनी भूमी अभिलेख अधीक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. ज्युनिअरला पदभार दिला जात असल्याबद्दल त्यांची नाराजी आहे. अमिता 2011 मध्ये KBC च्या चौथ्या सिझनमध्ये 50 लाख रुपये जिंकून चर्चेत आल्या होत्या.
सोशल मीडियावर विभागीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात पोस्ट टाकणाऱ्या अमिता सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. वारंवार होणाऱ्या बदल्यांबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिलं आहे. आपल्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचं अमिता सिंह तोमर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या राजीनामा पत्रात लिहिलं आहे. तहसीलदारांच्या प्रतिष्ठेचा अवमान होत आहे असंही म्हटलं आहे.
वरिष्ठ अधिकारी सातत्याने नायब तहसीलदार, भूमी अभिलेख अधीक्षकांना तहसीलदारपदाचा कार्यभार देत आहेत. त्यांना आधी तहसीलदार बनवले जाणार होते, परंतु त्यांनी निवडणूक शाखा आणि सध्या भूमी अभिलेख अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. सलग पाच वर्षे माझा अपमान होत आहे. ज्युनिअर लोक माझ्यावर जात असलेली पाहून मनाला अत्यंत वेदना होत असल्याचं म्हटलं आहे.
नवे जिल्हाधिकारी आल्यानंतर मला तहसीलदार केलं जाईल, असं यावेळी वाटत होतं. पण, यावेळीही माझा अपमान झाला आहे. त्यामुळे मी सरकारी नोकरीचा राजीनामा देत आहे. श्योपूरचे जिल्हाधिकारी संजय कुमार म्हणाले की, त्यांना राजीनामा पत्र मिळालेलं नाही. मीडियातच त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा सुपूर्द केला तरी तो मी स्वीकारणार नाही. सध्या या घटनेची चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.