ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - पनामा पेपर लीक प्रकरणावर अखेर अमिताभ बच्चन यांनी मौन सोडले आहे. इंडियन एक्सप्रेसने उल्लेख केलेल्या एकाही कंपनीबद्दल मला माहिती नाही. मी कोणालाही ओळखत नाही. त्या कंपन्यांचा माझ्याशी संबंध नाही. मी कुठल्याही कंपनीचे संचालकपद भूषवलेले नाही. माझ्या नावाचा गैरवापर झाला आहे. मी सर्व कर भरले आहेत. अगदी परदेशात केलेल्या खर्चाचाही कर भरला आहे असे स्पष्टीकरण अमिताभ यांनी मंगळवारी दिले.
इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तातही मी काहीही बेकायद केल्याचे म्हटलेले नाही असे अमिताभ यांनी सांगितले. इंडियन एक्सप्रेसने काल पनामातील मोसॅक फोन्सेका या कायदा कंपनीतील कागदपत्रातील तपशील उघड केला. हा तपशील जाहीर झाल्यामुळे अनेक देशातील नेते, सेलिब्रिटी अडचणीत आल्या आहेत.
T 2197 - I do not know any of the companies referred to by Indian Express - Sea Bulk Shipping Company Ltd, (cont) https://t.co/QlcY6vDo6J— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 5, 2016
या कागदपत्रांमध्ये भारतातील ५०० हून अधिक जणांची नावे असून, यामध्ये अमिताभ बच्चन आणि त्यांची सून ऐश्वर्या राय यांचेही नाव आहे. या पेपरमध्ये ज्यांची नावे आली आहेत त्यांच्यावर कर चुकवेगिरीचा आरोप करण्यात येत आहे.
इंडियन एक्सप्रेसने अमिताभ बल्क शिपिंग कंपनी लिमिटेड, लेडी शिपिंग लिमिटेड, ट्रेजर शिपिंग लिमिटेड आणि ट्राम्प शिपिंग लिमिटेड या चार कंपन्यांच संचालकपदावर असल्याचे म्हटले होते. अमिताभ यांनी या सर्व कंपन्यांशी आपला संबंध फेटाळला आहे. मोसॅक फोन्सेकामधून लीक झालेल्या ११.५ दशलक्ष कागदपत्रांची जगामधील १०० प्रसारमाध्यमांच्या गटांनी तपासणी केली. यामध्ये इंडियन एक्सप्रेस दैनिकही होते.