बीग बींनी ट्विटरवर काँग्रेसच्या बड्या नेत्यांना फॉलो केल्याने राजकीय चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 10:44 AM2018-02-22T10:44:01+5:302018-02-22T10:44:34+5:30
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांना फॉलो करायला सुरूवात केली आहे.
मुंबई- अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांना फॉलो करायला सुरूवात केली आहे. अमिताभ बच्चन यांनी अचानक ट्विटरवर काँग्रेस नेत्यांना फोलो करायला सुरूवात केल्याने पक्षात सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. अमिताभ बच्चन यांनी आधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटला फॉलो केलं. त्यानंतर त्यांनी पी चिदंबरम, कपिल सिब्बल, अहमद पटेल, अशोक गहलोत, अजय माकन, ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट आणि सीपी जोशी यांना याच महिन्यात फॉलो करायला सुरूवात केली.
नेहरू-गांधी परिवार आणि माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या खूप जवळ असणारे अमिताभ बच्चन सध्या गुजरातचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहेत. अमिताभ बच्चन फक्त 1 हजार 689 लोकांना फॉलो करतात. तर त्यांचे एकुण 33 मिलीयन फॉलोवर्स आहेत. अमिताभ बच्चन यांनी काँग्रेसच्या या नेत्यांना अचानक फॉलो केल्याने सगळेच हैराण झाले आहेत. तसंच राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी मनीष तिवारी, शकील अहमद, संजय निरूपम, रणदीप सुरजेवाला, प्रियंका चतुर्वेदी आणि संजय झा यांना ट्विटवर फॉलो करायला सुरूवात केली होती. काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या काही नेत्यांसाठी अमिताभ बच्चन यांनी दाखविलेल्या प्रेमामुळे पक्षातील अनेक हैराण झाले. अमिताभ बच्चन सध्या राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव, त्यांची मुलगी मीसा भारती, जदयू प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, सीताराम येचुरी, उमर अब्दुल्ला, सुप्रीया सुळे आणि आरजेडीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटला फॉलो करत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी काँग्रेस नेते मनीष तिवारी यांना फॉलो करायला सुरूवात केल्यानंतर मनीष तिवारी यांनी ट्विट करून बीग बींचे आभार मानले होते. दरम्यान, अमिताभ बच्चन ट्विटरवर भाजपाच्या काही नेत्यांनाही फॉलो करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी नितीन गडकरी व सुरेश प्रभूंना फॉलो केलं होतं.