लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने (हू) आग्नेय आशियात हेपेटायटिसबाबत जनजागृती वाढवून या साथीला आळा घालण्याच्या प्रयत्नांना वेग देण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची शुक्रवारी सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली. ‘हू’च्या प्रादेशिक संचालक (ईशान्य आशिया) पूनम खेत्रपाल सिंग यांनी बच्चन यांच्या नियुक्तीची घोषणा केली. हा ऐतिहासिक सहयोग असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. विषाणुजन्य हेपेटायटिसमुळे भारतासह या प्रदेशात दरवर्षी ४ लाख १० हजार लोक प्राण गमावतात. मी हेपेटायटिसच्या निर्मूलनास पूर्णपणे बांधील आहे. हेपेटायटिस बीने ग्रस्त असल्यामुळे त्याच्यापासून होणाऱ्या वेदना आणि त्रासाची मला पूर्ण जाणीव आहे. हेपेटायटिसचा त्रास कोणाच्याही वाट्याला येऊ नये, असे बच्चन यांनी मुंबईत म्हटले. हेपेटायटिसचे या भागाचे सदिच्छा दूत म्हणून बच्चन यासंदर्भातील जनजागृती मोहिमांसाठी आपला आवाज आणि पाठबळ देतील. बच्चन यांचा आवाज संपूर्ण देशभर ऐकला जातो. खरा बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य त्यांच्या आवाजात आहे. पोलिओ मोहिमेत हे आम्ही अनुभवले असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा म्हणाले. ——-बाळ जन्मल्यानंतर पहिल्या २४ तासांत एक आणि त्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत लसीचे तीन डोस दिल्यास आईपासून बाळाला होणाऱ्या हेपटायटिसच्या संसर्गास पायबंद बसतो, असे हूने सांगितले.
अमिताभ बच्चन ‘हू’चे हेपेटायटिस सदिच्छा दूत
By admin | Published: May 13, 2017 12:01 AM