ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 18 - ' कुछ दिन तो गुजारो गुजरात में' असे निमंत्रण देत गुजरात पर्यटनाची जाहिरात करणारे बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकलेल्या 'मौलाना' सिंहाचे बुधवारी निधन झाले. गिर अभयारण्याची शान आणि गुजरात पर्यटनाची 'खुशबू गुजरात की' जाहिरातीतील 'मौलाना' नावाचा हा सिंह सर्वात वयस्कर होता. अमिताभ यांच्यासोबतच्या जाहिरातीत मौलानासह 8 सिंह दिसले होते.
16 वर्षांचा 'मौलाना' सिंह हा आजारी असल्याने गेल्या काही काळापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. गिर अभयारण्याची शान असलेल्या 'मौलाना'ला पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी 2010 साली आपल्या ब्लॉगमध्ये मौलानासह तेथील सिंहांचे वर्णन केले होते. 'सिंह, केवळ एक नाही तर अनेक. ते येत आहेत 3 , 4... पूर्ण 7... त्यात त्यांचा म्होरक्यादेखील आहे. सोबतीला दोन सिंहिणी आणि बछडे. ते खूप शांततेत येत आहेत आणि तलावाच्या किनारी पाणी पीत आहेत. सर्वात वयस्कर सिंह एका कोप-यात बसला असून अन्य सिंह आताही पाणी पीत आहेत, आणि इकडे तिकडे उड्या मारत आहेत.' असे वर्णन बिग बींनी केले होते.
'विशिष्ट प्रकारच्या, आकर्षक दिसण्यावर त्याचे नाव मौलाना ठेवण्यात आले', असे मौलाना सिंहाच्या मृत्यूची माहिती देत असताना वन विभागाचे प्रमुख संरक्षक ए.पी. सिंह यांनी सांगितले. दीर्घकाळापर्यंत 'मौलाना'ने आपल्या प्रांतात अभिमानाने राज्य केले. अभयारण्यात मौलाना आणि राम नावाचा सिंह सर्वात वयस्कर होते. रामदेखील 16 वर्षांचा होता, त्याचेदेखील या महिन्यात निधन झाले. साधारण, सिंह आपल्या प्रांतातील प्रभुत्व जवळपास तीन वर्षांपर्यंत गमावतात. मात्र मौलाना आणि त्याचा भाऊ तपू यांचे वर्चस्व गेल्या अनेक वर्षांपासून कायम होते. या दोघांनी जवळपास 39 सिंह आणि बछड्यांच्या समुहावर राज्य केले .