ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - उघड्यावर शौचाला जाणा-यांची सवय बदलावी यासाठी बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन फोन करुन अशा लोकांना प्रेरित करणार आहेत. स्वच्छता मंत्रालयाकडून हे अभियान सुरु करण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यांना हागणदारीमुक्त घोषित करण्यात आलं आहे, तिथे अजूनही कोणी उघड्यावर शौचाला जात आहे का ? हे पाहणं या अभियानाचा मुख्य उद्देश असणार आहे. अभियानासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्री रेकॉर्डेड फोन कॉलची मदत घेतली जाणार आहे. हागणदारीमुक्त गावांमध्ये अजूनही किती लोक उघड्यावर शौचाला जातात याची माहिती या अभियानामार्फेत गोळा केली जाणार आहे.
पुढील आठवड्यात 10 दिवसांमध्ये एकूण 50 हजार लोकांना फोन करुन हा संदेश सुनावण्यात येण्याची मंत्रालयाची योजना आहे. देशातील 90 जिल्ह्यांमधील तब्बल 1.58 लाख गावांना हागणदारीमुक्त आणि स्वच्छ घोषित करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांचा फोन जाण्याआधी लोकांना एसएमएसद्वारे अमिताभ यांचा फोन येणार असल्याचा संदेश पाठवण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन यावेळी तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचं कोणी अजूनही उघड्यावर शौचाला जातं का ? असा प्रश्न विचारतील. लोकांना एक किंवा दोन नंबर दाबून उत्तर द्यायचं आहे.