नवी दिल्ली : बॉलिवूड सुरपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर काही काँग्रेस नेत्यांना फॉलो करण्यास सुरुवात केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.त्यांच्या पत्नी जया बच्चन यांची राज्यसभेची मुदत एप्रिलमध्ये संपत आहे. त्यांना तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर अतिमाभ यांनी काँग्रेस नेत्यांना फॉलो करण्याकडे पाहिले जात आहे. अमिताभ यांनी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी व त्या पक्षाचे अधिकृत ट्विटर हँडल फॉलो करायला सुरुवात केली. त्यांनी या महिन्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, कपिल सिब्बल, अशोक गहलोत, अहमद पटेल, अजय माकन, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, सी. पी. जोशी यांनाही ट्विटरवर फॉलो केले.राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव, मुलगी मिसा भारती, जनता दल (यू)चे नितीशकुमार, माकपचे सीताराम येचुरी, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, आपचे नेते मनिष सिसोदिया, गोपाल राय, संजय सिंग, कुमार विश्वास, आशिष खेतान यांना तसेच राजदलाही ट्विटरवर अमिताभ फॉलो करू लागले आहेत.
काँग्रेस नेत्यांचे अमिताभ ‘फॉलोअर'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 5:32 AM