लखनौ : उत्तर प्रदेश सरकारकडून ‘यश भारती’ पुरस्कृतांना दिली जाणारी दरमहा ५० हजार रुपये निवृत्तीवेतनाची रक्कम बीग बी अमिताभ बच्चन यांनी नम्रपणे नाकारत ती धर्मादाय कार्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.उत्तर प्रदेश सरकारचे आभार मानतानाच बच्चन यांनी याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना कळविणार असल्याचे एका निवदेनात नमूद केले. देशभरातील साहित्यिकांनी अहिष्णुता वाढविणाऱ्या सद्य:स्थितीबद्दल रोष व्यक्त करीत पुरस्कार परत करण्याचा सपाटा लावला असतानाच अखिलेश यादव यांनी मंगळवारी या पुरस्काराची घोषणा केली. आमच्या मंत्रिमंडळाने यश भारती पुरस्कारप्राप्त मान्यवरांना दरमहा ५० हजार रुपये निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले. (वृत्तसंस्था)