ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - आम आदमी पार्टीचे नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी एका कार्यक्रमादरम्यान बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांची कविता सादर केली होती. तसेच, या कार्यक्रमाचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला होता. यामुळे कुमार विश्वास यांच्यावर अमिताभ बच्चन यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे.
यावर कुमार विश्वास यांनी यांनी हरिवंश राय बच्चन यांची कविता सादर केल्याप्रकरणी अमिताभ बच्चन यांची ट्विटरच्या माध्यमातून माफी मागितली आहे. तसेच, ते म्हणाले की ""अनेक कवींच्या कुटुंबियांनी कौतुक केले....परंतू तुम्ही नोटीस पाठविली...बाबूजींच्या सन्मानार्थ अपलोड केलेला व्हिडीओ डिलीट करत आहे... तुम्ही मागणीनुसार 32 रुपये पाठवत आहे. धन्यवाद !"
दरम्यान, कुमार विश्वास यांनी हरिवंश राय बच्चन यांची कविता सादर केल्याप्रकरणी अभिताभ बच्चन यांनी कुमार विश्वार यांच्यावर कॉपीराइटची कायदेशीर नोटीस पाठविली आहे. यामध्ये कार्यक्रमात सादर केलेली हरिवंश राय बच्चन यांच्या कवितेचा व्हिडिओ युट्युबवरुन डिलीट करावा आणि त्यातून मिळाले मानधन द्यावे असे सांगितले आहे. तसेच, हरिवंशराय बच्चन यांची कविता माझ्या परवानगी शिवाय सार्वजनिक कार्यक्रमात सादर केलीच कशी काय? असा प्रश्न विचारत अमिताभ बच्चन यांनी कुमार विश्वास यांच्यावर चोरीचा आरोप लावला.
कुमार विश्वास तर्पण नावाने आपल्या कार्यक्रमात सादर केलेल्या कवितांचा व्हिडिओ युट्युबवर अपलोड करतात. 8 जुलै रोजी कुमार विश्वास यांनी हरिवंश राय बच्चन यांची कविता सादर केलेला व्हिडिओ युट्युब आणि ट्विटरवर अपलोड केला होता.