नवी दिल्ली : लाल किल्ल्यातील विहिरीत जिवंत काडतुसे आणि दारूगोळ्याच्या पेट्या आढळल्यामुळे सुरक्षा यंत्रणांत प्रचंड खळबळ उडाली. शनिवारी स्मारकाच्या स्वच्छतेचे काम सुरू असताना हा दारूगोळा आढळून आला. नॅशनल सेक्युरिटी गार्डला (एनएसजी) याबाबत कळविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे (एएसआय) लाल किल्ल्यातील विहिरींची स्वच्छता करण्यात येत असताना पब्लिकेशन इमारतीमागील एका विहिरीत काडतुसे आणि दारूगोळा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ परिसराची नाकेबंदी करून एनएसजी आणि लष्कराला घटनेची माहिती दिली. एनएसजीची बॉम्बशोधक आणि नाशक पथके घटनास्थळी पोहोचली आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले. लाल किल्ल्यात काहीतरी सापडले असून, आम्ही त्याची तपासणी करीत आहोत, असे एनएसजी अधिकाऱ्यांनी सांगितले. सायंकाळी पाच वाजता विहिरीत पाच मोर्टार आणि ४४ जिवंत काडतुसे आढळून आली. याशिवाय वापरलेली ८७ काडतुसेही आढळून आली. हा सरकारी दारूगोळा असण्याची शक्यता आहे. तथापि, चौकशीअंती खरे काय ते समोर येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. झाला होता दहशतवादी हल्ला२२ डिसेंबर २००० रोजी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने लाल किल्ल्यावर हल्ला केला होता. लष्करच्या दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ३ जवान शहीद झाले होते. त्यानंतरही अनेकदा लाल किल्ल्यावर हल्ल्याच्या अनेकदा धमक्या देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तेथे मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि दारूगोळा सापडणे गंभीर आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
लाल किल्ल्यातील विहिरीत दारूगोळा, काडतुसांचा साठा
By admin | Published: February 07, 2017 2:18 AM