नवी दिल्ली-
मुंबईत 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसा पठणावरुन निर्माण झालेल्या वादानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक झाली होती. सध्या राणा दाम्पत्य जामीनावर सुटलेलं असून ते नवी दिल्लीत आहेत. आज राणा दाम्पत्यानं नवी दिल्लीतील प्राचीन मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि महाआरती केली.
राणा दाम्पत्यानं नवी दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरापासून ते कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरापर्यंत पदयात्रा केली. त्यानंतर हनुमान मंदिरात आपल्या समर्थकांसह महाआरती केली. यावेळी नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठण देखील केलं. याचा व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेनं ट्विट केला आहे.
राणा दाम्पत्यानं यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. ठाकरे सरकारला सद्बुद्धी यावी अशी प्रार्थना भगवान हनुमानाकडे करणार असल्याचं रवी राणा यांनी म्हटलं होतं. तुम्ही मला फक्त वज्रमूठ द्या, दात पाडायचं काम मी करुन दाखवतो असं आवाहन करणाऱ्या शिवसेनेला नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर देताना हिंमत असेलतर आधी औरंगाबादच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांचे दात पाडून दाखवा. तेव्हाच मी तुम्हाला मानेल, असं त्या म्हणाल्या. तसंच उद्धव ठाकरेंनी आजच्या जाहीर सभेची सुरुवात हनुमान चालीसा पठणाने करुन दाखवावी, असंही नवनीत राणा म्हणाल्या.