- देवेश फडके
भारतीय रेल्वे ही प्रयोगांची मोठी फॅक्टरी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. प्रचंड यंत्रणा असलेली भारतीय रेल्वे गेल्या अनेक वर्षांपासून विविधांगी प्रयोग करत आहे. रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यापासून ते ट्रेन अद्ययावत, सुविधाजनक आणि सुरक्षित प्रवासासाठी सज्ज करण्यापर्यंत भारतीय रेल्वेने अनेक गोष्टी अमलात आणल्या आहेत. भारतीय रेल्वेचे अनेक प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. त्यातील अलीकडील एक प्रयोग म्हणजे वंदे भारत ट्रेन. टॅल्गोचा प्रयोग फसला, पण त्यातून वंदे भारत ट्रेनचा उदय झाला. ही नक्कीच अभिमानास्पद आणि कौतुकास पात्र अशीच गोष्ट आहे. वंदे भारतच्या धर्तीवर आता काही प्रयोग केले जात आहेत. पैकी अमृत भारत ट्रेन (Amrit Bharat Express) हा एक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतून पहिल्या दोन अमृत ट्रेनचे लोकार्पण झाले.
देशभरात दीर्घ पल्ल्याच्या अंतरावर अमृत भारत ट्रेन चालवण्याचा भारतीय रेल्वेचा मानस आहे. नवी दिल्ली ते दरभंगा व्हाया अयोध्या आणि मालदा ते बंगळुरू या दोन मार्गांवर पहिल्या दोन अमृत भारत ट्रेन चालवल्या जाणार आहेत. वंदे भारत ट्रेनला अभूतपूर्व यश मिळाले. परंतु, तिकिटाचे चढे दर, सुरुवातीला वंदे भारत ट्रेनला मिळालेला कमी प्रतिसाद आणि ही ट्रेन सामान्यांसाठी नाही, परवडणारी नाही, अशी झालेली टीका यातून काहीतरी मार्ग काढणे भारतीय रेल्वेला अत्यावश्यक होते. यावर तत्काळ उपाय म्हणून भारतीय रेल्वेने एक क्लृप्ती लढवली, तीच ही अमृत भारत ट्रेन. या ट्रेनची बांधणी सुरू असताना सुरुवातीला याला वंदे भारत साधारण ट्रेन असे संबोधले गेले. देशातील काही मार्गांवर या ट्रेनची चाचणी घेण्यात आली. यानंतर या ट्रेनचे नामकरण अमृत भारत ट्रेन करण्यात आले.
अमृत भारत ट्रेनचे वेगळेपण काय?
अमृत भारत ट्रेनच्या निमित्ताने भारतीय रेल्वेने सामान्य श्रेणी आणि द्वितीय श्रेणी यात काही बदल केले आहेत, जे प्रवाशांच्या दृष्टीने सुलभ आणि स्वागतार्ह असेच आहेत. ही ट्रेन ताशी १३० किमीचा वेग गाठू शकते, असे सांगितले जात आहे. अमृत भारत ट्रेनला २२ डबे असतील. रेल्वेने दिव्यांगांच्या सुविधांची विशेष काळजी घेतली आहे. ट्रेनमध्ये सुलभपणे चढ-उतार करता यावा, यासाठी एक स्पेशल सोय करून देण्यात आली आहे. पुश-पुल तंत्रज्ञानावर आधारित अमृत भारत ट्रेन आहे. अमृत भारत ट्रेनमध्ये लगेज रॅक किंवा रॅकवरही कुशन बसवले आहेत. सामान्य ट्रेनच्या तुलनेत आसने आरामदायी आणि आकर्षक बनवण्यात आली आहेत. विशेष बाब म्हणजे अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये मेट्रोसारखे गँगवे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाऊ शकतात. प्रत्येक सीटजवळ चार्जिंग पॉइंट देण्यात आले आहेत. बॉटल होल्डर देण्यात आला आहे. अशा अनेक सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच कवच यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरांची नजर, बायो-वॅक्युम टॉयलेट्स, सेंसरवर आधारित नळ, प्रवाशांच्या माहितीसाठी सूचना फलक, एलईडी लाइट्सचा उत्तम वापर, अशा काही नमूद करण्यासाठी गोष्टी अमृत भारत ट्रेनमध्ये दिल्या गेल्या आहेत. याशिवाय सेमी पर्मनंट कपलर्स या ट्रेनमध्ये लावले गेले आहेत. त्यामुळे गाडी सुटताना आणि ब्रेक लावल्यानंतर बसणारे धक्के बहुतांश प्रमाणात कमी होतील, असा दावा करण्यात आला आहे. सामान्य एलएचबी डब्यांमधून प्रवास करताना ट्रेन सुटताना आणि ट्रेनने ब्रेक लावल्यानंतर जोरात धक्के बसतात. यावर उपाय म्हणून सेमी पर्मनंट कपलर्स हे तंत्रज्ञान भारतीय रेल्वेने आणले आहे, ही नक्कीच चांगली बाब आहे. तसेच ट्रेन अधिक वेगात असल्यावर बाहेरील हवा आतमध्ये येते, त्यामुळे ट्रेनच्या स्टेबिलिटीवर याचा परिणाम होतो. यावर उपाय म्हणून फुल्ली कव्हर वेस्टिबुल तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
शरीर तेच, पण कपडे फक्त बदलले?
वंदे भारत ट्रेनला वाढता प्रतिसाद असला तरी भारतीय रेल्वेच्या अपेक्षांवर ही ट्रेन अद्याप उतरली नसल्याचे चित्र आहे. सामान्य प्रवाशांसाठी वेगवान प्रवासाचा रेटा, अन्य सामान्य ट्रेन आणि वंदे भारत यातील पोकळी, वंदे भारत ट्रेनसारखा प्रवास करण्याची अनेकांची इच्छा यातून काहीतरी सुवर्णमध्ये काढणे भारतीय रेल्वेला क्रमप्राप्त होते. त्यातच वंदे भारतचा पांढरा आणि निळा रंग बदलून केशरी साज चढवल्याचे स्वागत झाले. काहीशी टीकाही झाली. मात्र, या टीकेला न जुमानता वंदे भारत साधारण ट्रेनची संकल्पना भारतीय रेल्वेने आणली. हुकुमी एक्का असलेले एलएचबी (LHB तंत्रज्ञानावर आधारित डबे) रेक घेण्यात आला. नव्या वंदे भारत प्रमाणे केशरी, करड्या रंग दिला गेला आणि सामान्य, द्वितीय श्रेणीच्या अंतर्गत सजावटीत काहीसे बदल केले आणि साकारली वंदे भारत साधारण ट्रेन. या प्रयोगामुळे कमी कालावधीत ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आणणे शक्य झाले. काहीतरी नवीन केल्यासारखे भासवले जात आहे. एलएचबीचे डबे जवळपास सर्वच प्रकारच्या ट्रेनमध्ये वापरले जात आहेत. त्यामुळे केवळ रंगरुप सोडले तर यात विशेष असे काहीच नाही, असेच दिसत आहे. पुश-पुल तंत्रज्ञानाचे म्हणाल तर, मुंबई ते दिल्ली या मार्गावर मध्य रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये हेच तंत्र वापरले जात आहे. पश्चिम रेल्वेवरील मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमध्ये काही काळासाठी पुश-पुल तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, तो पुढे कायम ठेवला गेला नाही. दुसरे म्हणजे ही राजधानी आता तेजस राजधानी या प्रकारात चालवली जाते. सेमी पर्मनंट कपलर्ससारखे तंत्रज्ञान राजधानीपासून ते अंत्योदय एक्स्प्रेसपर्यंत सर्वच एलएचबी ट्रेनमध्ये उपलब्ध करून दिल्यास प्रवास आणखी आरामदायी होऊ शकेल. पण, रेल्वेने तसे करायला हवे.
जुन्या सेवा बंद अन् नवीन सेवा सुरू; पण देखभाल-दुरुस्तीचे काय?
वंदे भारत एक्स्प्रेस ही शताब्दी ट्रेनला पर्याय म्हणून आणली. त्याच धरतीवर, अंत्योदय एक्स्प्रेस आणि जनसाधारण एक्स्प्रेस या ट्रेनला पर्याय म्हणून अमृत भारत ट्रेन आणल्याचे सांगितले जात आहे. विचार करण्यासाठी गोष्ट म्हणजे, अंत्योदय एक्स्प्रेस मोठ्या थाटात सुरू करण्यात आली. अनेक सुविधा सामान्य श्रेणीच्या प्रवासासाठी प्रवाशांना देण्यात आल्या. असे असले तरी या ट्रेनला मिळणारा प्रतिसाद आणि विस्तार या दोन्हींमध्ये भारतीय रेल्वे यशस्वी झालेली दिसत नाही. काही ट्रेनना दीनदयालू कोच लावण्यात आले आहेत. यामध्येही चांगल्या सुविधा देण्याचा दावा करण्यात येतो. मात्र, सामान्य श्रेणीचे डबे आणि ट्रेन यांची अवस्था अतिशय बिकट असल्याचे पाहायला मिळते. डब्यांच्या काचा तुटलेल्या असणे, अस्वच्छता, आसनांची दुरवस्था, देखभाल-दुरुस्तीची वानवा अशा अनेक समस्यांचा सामना करत प्रवास करणे प्रवाशांना भाग पडते. आता अमृत भारत ट्रेन ही सामान्य श्रेणी आणि द्वितीय शयनयान असलेली ट्रेन आहे. ही ट्रेन दीर्घ पल्ल्याची आहे. या ट्रेनची दुरवस्था होणार नाही, याकडे रेल्वेने विशेष लक्ष द्यायला हवे. दुसरे म्हणजे सध्या अमृत भारत ट्रेन नॉन एसी प्रकारात आहे. परंतु, कालांतराने या ट्रेनला थ्री टियर इकॉनॉमीसारखे काही एसी कोच लावले जाऊ शकतील, असा कयास आहे. याचे कारण म्हणजे अमृत भारत ट्रेनचे कापले जाणारे अंतर मोठे आहे. अन्य ट्रेनच्या तुलनेत यातील सुविधा आणि वेग जास्त असणार आहे. त्यामुळे सामान्य ट्रेन आणि अमृत भारत यांच्यात समतोल साधण्यासाठी, प्रवाशांना अन्य ट्रेनच्या वातानुकुलित तिकिटांच्या तुलनेत स्वस्तात एसीतील गारेगार प्रवासाची संधी देण्यासाठी भारतीय रेल्वे याचा विचार करू शकते, अशी चर्चा असल्याचे समजते.
अमृत भारत ट्रेनची वाटचाल
अमृत भारत ट्रेनचा पहिला रेक तयार झाल्यावर या ट्रेनची देशातील अनेक मार्गांवर चाचणी घेण्यात आली. मुंबई ते दिल्ली कर्जतमार्गे मध्य रेल्वेवर, मुंबई ते दिल्ली बडोदामार्गे पश्चिम रेल्वेवर या ट्रेनची चाचणी झाली. त्यामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर आगामी काळात अमृत भारत ट्रेन दिसू शकेल. मुंबई ते नवी दिल्ली हा मार्ग अमृत भारत ट्रेनच्या आगामी यादीत आहेत. तसेच याशिवाय काही दाव्यांनुसार, पाटणा-नवी दिल्ली, हावडा-नवी दिल्ली, हैदराबाद-नवी दिल्ली, एर्नाकुलम-गुवाहाटी, जम्मू-चेन्नई, गोमती नगर-कटरा, गोमती नगर-मुंबई, सीवान-नवी दिल्ली अशा काही मार्गांवर ही ट्रेन प्रस्तावित आहे. दुरंतो, विवेक, हमसफर या ट्रेनही दीर्घ पल्ला गाठतात. याच आधारवर अमृत भारत ट्रेन लांब अंतर असलेल्या मार्गांवर चालवली जाईल, असा कयास आहे.
शेवटी, भारतीय रेल्वेत प्रचंड क्षमता आहे. अनेक प्रयोगांती रेल्वेने स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. दुरंतो, गरीब रथ, अंत्योदय, हमसफर, जनसाधारण, राजधानी, शताब्दी, तेजस, डबलडेकर, वंदे भारत असे अनेक प्रयोग आतापर्यंत भारतीय रेल्वेने केले. काही अतिशय यशस्वी ठरले. तर काहींकडे प्रवाशांनी सपशेल पाठ फिरवली. जाता जाता भारतीय रेल्वेला एवढेच सागावेसे वाटते की, विद्यमान वंदे भारतची संरचना, सोयी-सुविधा कायम ठेवून त्याचे रुपांतर नॉन-एसी ट्रेनमध्ये केले असते आणि अशी ट्रेन सेवेत सादर केली असती, तर प्रवाशांसाठी खऱ्या अर्थाने ‘अमृत भारत’ सार्थकी ठरले असते.