स्वयंघोषीत खलिस्तानी समर्थक आणि 'वारिस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल सिंग यांचा व्हिडिओ समोर आला आहे. मी मजेत असून कुणीही माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही, असं खुलं आव्हानच त्यानं प्रशासनाला दिलं आहे. आपल्यावर देवाचा आशीर्वाद असून पोलिसांच्या प्रचंड गराड्यातूनही मी बाहेर पडू शकलो आहे, असंही तो व्हिडिओमध्ये म्हणाला आहे.
"माझ्या अटकेचे सारे धागेदोरे देवाच्या हातात आहेत. देवाची इच्छा होईल तेव्हाच मला अटक होईल. मी आता मजेत असून कुणी माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही. खर्या अर्थानं देवानं कठीण काळात आमची परीक्षा घेतली, पण सर्वशक्तिमान देवानं मला खूप साथ दिली आहे. माझ्यावर एवढा मोठा आशीर्वाद आहे की मी एवढ्या मोठ्या पोलिसांच्या घेरातूनही बाहेर पडलो. सारी देवाची कृपा आहे", असं अमृतपाल सिंग व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतो.
खालसा शीख संघटनांची धार्मिक परिषद बोलावण्यात यावी, असं त्याचं म्हणणं आहे. देश-विदेशात जिथे जिथे शीख मंडळी बसली आहेत, मी त्यांना आवाहन करतो की, बैसाखीच्या दिवशी होणाऱ्या या सरबत खालसामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे आणि तिथूनच समाजाच्या प्रश्नांवर बोललं पाहिजे, कारण आपला समाज प्रदीर्घ काळापासून आपला आहे. आमचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. सरकारनं आमच्यावर अन्याय केला आहे. आमच्या सहकाऱ्यांवर NSA लादून त्यांना आसाममध्ये पाठवण्यात आलं कारण त्यांनी शीख धर्माबद्दल वक्तव्य केली, असंही अमृतपालनं म्हटलं आहे.
माझ्या अनेक सहकाऱ्यांना आसाममध्ये पाठवण्यात आलं असून काहींना तुरुंगात टाकण्यात आलं आहे. हा आमच्यावर सरळ अत्याचार आहे. आपण ज्या मार्गावर चालत आहोत त्या मार्गावर आपल्याला हे सर्व सहन करावं लागणार आहे आणि हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे हे आपण जाणतो. मी देश-विदेशात बसलेल्या तमाम शीख मंडळींना आवाहन करतो की, बैसाखीला होणाऱ्या सरबत खालसाकडे लक्ष द्या आणि आमच्या जत्थेदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे धार्मिक कीर्तनांचं आयोजन करून गावोगावी जा, असंही तो आवाहन करताना दिसतो.