चंडीगड : फरारी खलिस्तान समर्थक आणि 'वारीस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याच्या आत्मसमर्पणाची चर्चा जोरात सुरू आहे. अकाल तख्तचे जत्थेदार हरप्रीत सिंह यांनी आज तलवंडी साबो येथील दमदमा साहिब येथे 'विशेष सभा' आयोजित केली आहे. या सभेत धर्माचा प्रचार आणि राष्ट्रीय हक्कांचे संरक्षण, विचारांचे स्वातंत्र्य, आव्हाने आणि शीख माध्यमांचे योगदान यावरही चर्चा होणार आहे. तसेच, या सभेत पंथ, पंजाब आणि पंजाबियतला समर्पित देश-विदेशातील जत्थेदार, लानेदार, निहंग विचारवंत आणि शीख विचारवंत सहभागी होणार आहेत.
या सभेबाबत गुप्तचर यंत्रणांसोबतच पंजाब पोलिसांचे इंटेलिजन्स विंग अलर्ट मोडवर आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, अमृतपाल सिंग आत्मसमर्पण करण्यासाठी किंवा या विशेष सभेसाठी उपस्थित राहू शकतो, यासाठी पोलिसांच्या सीआयडी शाखेचे अधिकारी साध्या गणवेशात सतर्क आहेत. दमदमा साहिबच्या 'विशेष सभेत' अमृतपाल सिंग आत्मसमर्पण करेल, अशी पोलिसांना शक्यता वाटते. यासंदर्भात पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स विंग आणि इतर ऑपरेशन टीम्समध्ये बैठक झाली आहे.
दरम्यान, पंजाब डीजीपीच्या कार्यालयाने राज्यातील पोलिस कार्यालयांच्या प्रमुखांना पाठवलेल्या तातडीच्या संदेशात 14 एप्रिल 2023 पर्यंत सर्व राजपत्रित, अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच 14 एप्रिलपर्यंत कोणत्याही प्रकारची नवीन सुट्टी मंजूर करू नये, असे पोलीस कार्यालय प्रमुखांना सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, खलिस्तानी फरार अमृतपाल सिंग याने जत्थेदारांकडे व्हिडिओ संदेशाद्वारे 'सरबत खालसा' बोलावण्याची मागणी केली होती. मात्र तसे न करता आता अकाल तख्तने 'बैसाखी समागम' जाहीर केला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणत्याही अनुचित परिस्थितीला तोंड देण्यासाठी तळवंडी साबो येथे तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
18 मार्चच्या पोलिस कारवाईनंतर अमृतपाल सिंग फरार आहे. पोलीस अधिकाऱ्यांना त्याने कोणत्याही डेरा किंवा धार्मिक स्थळी आश्रय घ्यावा असे वाटत नाही, कारण या ठिकाणी कारवाई केल्यास त्याचे अप्रिय परिणाम होऊ शकतात. मात्र, अधिकाऱ्यांनी सांगितले की, अकाल तख्तचे जत्थेदार अमृतपाल सिंग याला दमदमा साहिब येथे आश्रय घेण्यासाठी 'विशेष मेळाव्या'चा वापर करू देणार नाहीत, अशी आशा पोलिसांना आहे.