खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग आता पोलिसांच्या ताब्यात आहे. पंजाबमधील मोगा येथील रोडेवाल गावात असलेल्या गुरुद्वारातून त्याला अटक करण्यात आली आहे. अमृतपालची अटक होण्याच्या एक दिवस आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्याच्यासंदर्भात एक वक्तव्य केले होते. अमृतपाल पूर्वी मोकाट फिरत असे, पण आता तो सुटू शकत नाही, असे शाह म्हणाले होते. अमित शाह बेंगळुरूमध्ये म्हणाले की, देशात खलिस्तानी लाट नाही आणि केंद्र परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
अमृतपालला कधीही अटक होऊ शकते, असंही शाह म्हणाले होते. आता तो पोलिसांपासून जास्त काळ पळून जाऊ शकत नाही. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. भारताच्या एकतेवर आणि सार्वभौमत्वावर कोणीही हल्ला करू शकत नाही. पंजाब आणि केंद्र सरकारने कौतुकास्पद काम केले आहे. पूर्वी तो मोकळेपणाने फिरत असे, मात्र आता तो गुन्हेगारी कारवाया करू शकत नाही, असंही शाह म्हणाले.
अमृतपालच्या आंदोलनाची संपूर्ण माहिती पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पोलिसांकडून सातत्याने दिली जात होती. गेल्या महिनाभरात अमृतपालचे संपूर्ण नेटवर्क एकामागून एक उद्ध्वस्त करण्यात आले. सीएम मान यांच्या निर्देशानुसार पंजाब पोलीस सातत्याने कारवाई करत होते. तीन दिवसांपूर्वी अमृतपालची पत्नी किरणदीप कौर यांना अमृतसर विमानतळावर थांबवण्यात आले होते.
२३ फेब्रुवारी २०२३ रोजी अमृतपाल सिंग यांनी अजनाला घटना घडवली. यावेळी त्यांनी अमृतसरजवळील अजनाळा पोलिस स्टेशनला वेढा घातला आणि त्यांच्या एका साथीदाराच्या सुटकेची मागणी केली. यात ६ पोलीसही जखमी झाले. तेव्हापासून पंजाब पोलिसांनी अमृतपालचा शोध सुरू केला होता. १८ मार्चपासून त्याला पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू होते. (Amritpal Singh Arrest)