अमृतसर : ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंगच्या शोधासाठी पाचव्या दिवशीही ऑपरेशन सुरू आहे. ज्या दुचाकीवरून तो पळून गेला ती दुचाकी पोलिसांनी बुधवारी जप्त केली. जालंधरपासून जवळपास ४५ किमी अंतरावर दारापूरमध्ये ही दुचाकी सापडली. दरम्यान, अमृतपालने वेश बदलला असून, दाढी कमी केली आहे.
एनआयएची आठ पथके दाखल पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या ४५८ जवळच्या साथीदारांची ओळख निश्चित केली असून, त्यांची यादी एनआयएकडे सोपवली आहे. या लोकांची ए, बी आणि सी श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे. ए श्रेणीत १४२ लोक आहेत. जे २४ तास अमृतपालसोबत असतात. बी श्रेणीत २१३ लोक आहेत. जे वित्त आणि संस्थेचे काम पाहतात. एनआयएची आठ पथके पंजाबमध्ये पोहोचली असून, या पथकांनी अमृतसर, तरणतारण, जालंधर, गुरुदासपूर, जालंधर जिल्ह्यात तपास सुरू केला आहे.
स्थगन प्रस्ताव फेटाळलापंजाब विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेबाबतचा काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव फेटाळण्यात आला. तर, अमृतपाल सिंग याच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्याने शिरोमणी अकाली दलाने टीका केली. त्यामुळे सभागृहात बुधवारी मोठा गदारोळ झाला. पंजाब सरकारने मंगळवारी तरन मारन, फिरोजपूर, मोगा, संगरूर, अमृतसरच्या अजनाळा आणि मोहल्लाच्या काही भागात मोबाइल इंटरनेट आणि एसएसएम सेवांवरील बंदी गुरुवारी दुपारपर्यंत वाढविली आहे.
पत्नीवर खलिस्तानी चळवळीस मदतीचा आरोपपोलिसांनी अमृतपालच्या आईची दुपारी अमृतसरच्या जल्लूपूर खेडा गावात तासभर चौकशी केली. अमृतपालची पत्नी किरणदीप कौर हिचीही चौकशी केली. किरणदीप कौर ही एनआरआय आहे. ती बब्बर खालसाची सक्रिय सदस्य आहे. ती बब्बर खालसासाठी निधी जमा करते, असे समजते. याच कारणास्तव तिला आणि आणखी पाच जणांना २०२० मध्ये अटक झाली होती. तिच्यावर ब्रिटनमधून खलिस्तान चळवळीला आर्थिक मदत करण्याचा आरोप आहे.
अंतिम लोकेशन फिरोजपूर-मोगा राेडअमृतपाल सिंग याचे शेवटचे लोकेशन फिरोजपूर-मोगा रोडच्या दिशेने आहे. तिथे सीसीटीव्हीमध्ये तो शेवटचा दिसला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो फिरोजपूरकडे वळल्याचे दिसत आहे. नंगल अंबिया गावातून हा रस्ता फिरोजपूर आणि मोगा या दोन्ही मार्गांना जोडतो. अमृतपाल बठिंडा किंवा राजस्थानलाही जाऊ शकतो.
नेमके काय घडले? अमृतपालचे एक छायाचित्र समोर आले आहे. ज्यामध्ये त्याने वेश बदलला आहे. त्याने दाढी कमी केली आहे. पगडी परिधान केलेली आहे. तो शर्ट आणि जिन्समध्ये दुचाकीवर बसलेला दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल ब्रेझा कारमधून नंगल अंबिया गावात पोहोचला होता. येथे गुरुद्वारात त्याने पोशाख बदलला. यानंतर तो दुचाकीवर पळून गेला. पोलिसांनी मनप्रीत मन्नाच्या शाहकोट येथील घरातून ब्रेझा कार जप्त केली. मन्ना हा अमृतपालचा माध्यम सल्लागार असल्याचे सांगितले जाते. याशिवाय गुरदीप दीपा, हरप्रीत हॅप्पी आणि गुरभेज भेज्जा यांनाही अटक केली आहे.
शस्त्राच्या धाकावर एक तास बंदी ग्रंथीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमृतपालविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. ग्रंथींनी सांगितले की, आपल्या मुलाला पाहण्यासाठी मुलीकडील लोक येणार होते. आम्हाला वाटले की, अमृतपाल हा मुलीकडील व्यक्ती आहे. आम्ही त्याला आत बोलावले. ग्रंथींची पत्नी नरिंदर कौर यांनी सांगितले की, शस्त्राच्या धाकावर एक तास बंदी बनविले. त्यांच्याकडे पिस्तूल, रायफल, तलवारीही होत्या. अमृतपाल फोनवर कुणाला तरी कॉल करत होता.