फरार अमृतपाल सिंग (Amritpal Singh) याने आत्मसमर्पण (Surrender) केले आहे. पंजाबमधील अजनाला घटनेनंतर (Ajnala Incident) 'वारिस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल सिंग फरार झाला होता. अमृतपाल सिंग हा खलिस्तानचा समर्थक आहे. अमृतपाल सिंगने मोगाच्या रोडा गावात आत्मसमर्पण केले.
अमृतपाल सिंगचा साथीदार पापलप्रीत सिंग याला आधीच अटक करण्यात आली होती, तेव्हापासून अमृतपाल सिंगला लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अमृतपाल सिंग 36 दिवसांपासून फरार होता. शांतता भंग करणे, हिंसाचार भडकावणे असे अनेक आरोप अमृतपाल सिंगवर आहेत. सध्या आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी अमृतपाल सिंगला अटक केली आहे.
नुकतेच अमृतपाल सिंह यांची पत्नी किरणदीप कौरला पोलिसांनी विमानतळावर रोखले होते. किरणदीप कौरला लंडनला जायचे होते, पण विमानात चढण्यापूर्वीच किरणदीपला थांबवण्यात आले. यानंतर आता अमृतपाल सिंग पकडला गेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मसमर्पण करण्यापूर्वी अमृतपाल सिंगने पोलिसांसमोर सर्व अटी ठेवण्याचा प्रयत्न केला. पंजाबच्या तुरुंगात ठेवा, अत्याचार करू नका, असे अमृतपाल सिंग म्हणाला. मात्र, फरार झालेल्या अमृतपाल सिंगच्या आत्मसमर्पणानंतर पोलिसांच्या अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
भिंद्रनवालेच्या गावात केले आत्मसमर्पणअमृतपाल सिंग भिंद्रनवालेच्या गावातच शरण आला. अनेक राज्यात पोलीस अमृतपाल सिंगचा शोध घेत होते. अमृतपाल सिंग 18 मार्चपासून फरार होता. अमृतपाल सिंग वेश बदलून पळून गेला होता. दिल्ली आणि पंजाबमध्ये अनेक ठिकाणी अमृतपालचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. विशेष म्हणजे, अमृतपाल सिंग आणि त्याच्या 'वारिस पंजाब दे' संस्थेच्या सदस्यांविरुद्ध कारवाई 18 मार्चपासून सुरु झाली होती. अमृतपाल सिंग मात्र अनेकवेळा पोलिसांच्या तावडीत अडकून निसटला. पण अखेर अमृतपाल सिंगला शरणागती पत्करावी लागली.
अमृतपाल सिंगने नेमकं काय केलं होतं?23 फेब्रुवारीला अमृतपाल सिंग चर्चेत आला होता. त्याने आपल्या काही सहकाऱ्यांना सोडवण्यासाठी हजारो समर्थकांसह अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. यामध्ये सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. यानंतर त्याने काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत वेगळ्या खलिस्तानची मागणी केली होती. इतकंच नाही तर अमृतपालने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनाही धमकी दिली होती.
कोण आहे अमृतपाल सिंग ?अमृतपाल सिंग हा 'वारिस पंजाब दे' या संघटनेचा प्रमुख आहे. खलिस्तान या वेगळ्या देशाची त्याची मागणी आहे. तो दुबईहून परतला आहे. 'वारिस पंजाब दे' ही संघटना पंजाबी अभिनेता दीप सिद्धूने तयार केली आहे. दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर अमृतपाल सिंगने संघटनेचा ताबा घेतला. त्याने भारतात येऊन लोकांना संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न केला. अमृतपाल सिंग आयएसआयशी जोडल्याचा आऱोप आहे.