नवी दिल्ली: आसामच्या दिब्रुगड तुरुंगात बंद असलेल्या 'वारीस पंजाब दे' संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग याचे वडील तरसेम सिंग यांना आज अमृतसर विमानतळावर सुरक्षा यंत्रणांनी रोखले. त्यांना कतारची राजधानी दोहा येथे जायचे होते. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी त्यांना जाऊ दिले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा अधिकाऱ्यांनी तरसेम सिंग यांची विमानतळावर चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना घरी परत पाठवले. तरसेम सिंग आज सकाळी अमृतसर विमानतळावर पोहोचले. यापूर्वी अमृतपाल सिंग याची पत्नी किरणदीप कौर यांना दिल्ली आणि अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन वेळा परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले होते. किरणदीप कौर या ब्रिटिश नागरिक आहेत.
अमृतसरमधील अजनाला पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पंजाबपोलिसांनी अमृतपालविरोधात मोठी मोहीम उघडली होती. अनेक दिवसांच्या शोधानंतर पोलिसांनी अमृतपालला अटक केली. अमृतपालवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) कारवाई करण्यात आली आहे. तो सध्या आसाममधील दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहात बंद आहे.
दरोडा आणि अपहरणाचा आरोपी मनदीप सिंग उर्फ तुफान याला सोडवण्यासाठी अमृतपाल सिंगने यावर्षी फेब्रुवारीमध्ये अजनाळा पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. अमृतपालने श्री गुरु ग्रंथ साहिब जीच्या वेषात हजारो समर्थकांसह त्याच्या जल्लुखेडा गावातून पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात एसपी जुगराज सिंह यांच्यासह सहा पोलीस जखमी झाले. अमृतपाल सिंग याच्याविरुद्ध बाबा बकाला पोलिस ठाण्यात शस्त्र बाळगल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी त्याच्या साथीदारांसह आनंदपूर खालसा फोर्सची स्थापना केली होती.