अमृतसर - अमृतसर येथे रविवारी (18 नोव्हेंबर) सकाळी निरंकारी पंथाच्या 'संत समागम' या धार्मिक कार्यक्रमासाठी जमलेल्या भाविकांवर हल्लेखोरांनी हातबॉम्ब फेकल्यानं तीन जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या हल्ल्यानंतर राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनआयएची तुकडी या हल्ल्याचा तपास करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे. हा दहशतवादी हल्ला असावा, अशी शक्यता अमृतसरचे पोलीस आयुक्त एस.श्रीवत्स यांनी व्यक्त केली आहे. यादरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅ.अमरेंद्र सिंग यांनी हल्लेखोरांबाबत माहिती देणाऱ्यांना 50 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
(अमृतसमध्ये निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला; तीन ठार; दोघे संशयित ताब्यात)
अडलीवाला गावात रविवारी झालेल्या या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला होता. अडलीवाला येथील निरंकारी भवनात दर रविवारी भाविकांची मोठी गर्दी जमते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बुरखा घातलेले दोन जण बाईकवरुन आले. यातील एकाची लांब दाढी होती. सभागृहाच्या प्रवेशद्वारावरील सेवादारास बंदुकीचा धाक दाखवून हे दोघे आत घुसले. सोबत आणलेला हातबॉम्ब लोकांवर फेकून दोन्ही हल्लेखोर पळून गेले.
हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात ?पंजाबचे मुख्यमंत्री कॅ.अमरेंद्र सिंग यांनी यामागे पाकिस्तानसमर्थित खलिस्तानी किंवा काश्मिरी अतिरेक्यांचा हात असावा, असा ठाम संशय व्यक्त केला आहे. त्यांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे.
फिरोजपूर जिल्ह्यात पाकिस्तानमधील 'जैश-ए-मोहम्मद' या अतिरेकी संघटनेचे सहा-सात दहशतवादी शिरल्याची गुप्तवार्ता गुप्तहेर विभागानं दिल्यापासून पंजाबमध्ये हाय अॅलर्ट आणि नाकाबंदी सुरू आहे. त्यापूर्वी काही अज्ञात सशस्त्र व्यक्तींनी पठाणकोट शहरात ड्रायव्हरला धमकावून एक इनोव्हा टॅक्सी पळवली होती.