अमृतसर - पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान मोठा अपघात घडला आहे. येथे रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या लोकांना रेल्वेने धडक दिल्याने झालेल्या अपघातात 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे आयोजित रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी अनेकजण कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभे होते. कार्यक्रम सुरू असतानाच अचानक भरधाव ट्रेन आल्याने बेसावध असलेले लोक ट्रेनखाली चिरडले गेले. दरम्यान, अपघातात 200 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
अमृतसरजवळील जौडा रेल्वेफाटक परिसरातील चौरा बाझार येथे रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. त्या कार्यक्रमासाठी हजारो जण उपस्थित होते. रावण दहन झाले उपस्थितांपैकी अनेक जण ट्रॅकवर उभे होते. त्याचवेळी तेथे भरधाव वेगात आलेली ट्रेन ट्रॅकवर उभ्या असलेल्यांना उडवत निघून गेली. अपघातानंतर घटनास्थळावर मृतदेहांचा खच पडला होता. रावण दहनाचा कार्यक्रम व्यवस्थित दिसावा म्हणून उपस्थित लोक उंचवट्याच्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर उभे होते. त्यापैकी अनेक जण या कार्यक्रमाचे चित्रिकरण करत होते. त्याचदरम्यान अचानक ट्रेन आल्याने बेसावध असलेले अनेकजण ट्रेनखाली आले.
दरम्यान, अपघातात 50 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या अपघातप्रकरणी सर्व कायदेशीर कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले. रेल्वे मंत्रालयाकडूनही मदत आणि बचाव पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. तसेच रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळाला भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.