नवी दिल्ली - पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमावेळी उपस्थितांना भरधाव ट्रेनने उडवल्याची भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 61 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. आता, याप्रकरणी तपास करणाऱ्या रेल्वेच्या प्रमुख सुरक्षा आयुक्तांचा अहवाल आला आहे. त्यामध्ये रेल्वे प्रशासनाला क्लीन चीट देण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या तपास समितीने (सीसीआरएस) दिलेल्या अहवालात रेल्वे प्रशासनाला क्लीन चीट देण्यात आली आहे. तर, या अपघात दुर्घटनेला पू्र्णपणे रेल्वे ट्रॅकवर उपस्थित असणारे लोकच जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. पंजाबमध्ये अमृतसरच्या धोबी घाट परिसरात दसऱ्यादिवशी रावणाचे दहन करण्यासाठी अनेक लोक एकत्र जमले होते. त्यावेळी, हा रावणदहन सोहळा पाहण्यासाठी रेल्वे ट्रॅकजवळही लोकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, या दरम्यान तेथून जाणाऱ्या डीएमयू रेल्वेच्या तावडीत हे लोक सापडले. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या रेल्वेच्या प्रमुख सुरक्षा आयुक्ताने याबाबतची कारणे सांगितली आहेत. त्यामध्ये रेल्वे प्रशासन आणि गाडीच्या ड्रायव्हरला क्लीन चीट देण्यात आली आहे. तर, अपघातात रेल्वे ट्रॅकवरील उपस्थितांनाच दोषी ठरविण्यात आले आहे. कारण, लोकांचा निष्काळजीपणाच त्यांच्या मृत्युचे कारण ठरल्याचे सीसीआरएसचे म्हणणे आहे. तसेच यापुढे कुठल्याही रेल्वे क्रॉसिंग लाईनजवळ जत्रा, कार्यक्रम, आंदोलन किंवा कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम घ्यावयाचा असल्यास सर्वप्रथम स्थानिक रेल्वे प्रशासनाला कळविण्यात यावे. त्यानुसार संबंधित अधिकारी रेल्वेच्या ये-जा वेळांमध्ये आवश्यकतेनुसार बदल करतील, असेही या अहवालात म्हटले आहे.