अमृतसर - पंजाबमधील अमृतसर येथे दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे क्षणातच आनंदी वातावरण शोकाकुल झाले होते. रावण दहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेननं चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये 19 ऑक्टोबरच्या रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61 जण मृत्युमुखी पडले, तर 72 जण जखमी झाले. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. दरम्यान, या दुर्घटनेनंतर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत आणि दुसरीकडे पोलीस रावण दहन कार्यक्रमाचा आयोजक व काँग्रेस नेत्याचे पुत्र सौरभ मदानचा शोध घेत आहेत. रेल्वे दुर्घटनेनंतर सौरभ मदान फरार झाला असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडीदरम्यान, सौरभ मदान मिट्ठूचा स्वतःला निर्दोष सांगणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.
(रेल्वेचालक खोटे बोलत आहे, स्थानिकांनी केला दावा)
काय म्हटलंय सौरभ मदाननं व्हिडीओमध्ये?अमृतसर रेल्वे अपघात ही खूपच दुःखद घटना आहे. या वेदनादायी घटनेमुळे मी खूप दुःखी झालो आहे. माझी सध्याची परिस्थिती मी कथनदेखील करण्याच्या अवस्थेत नाहीय. सर्वांना एकत्र आणण्यासाठी दसरा उत्सवाचं आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी लागणाऱ्या सर्व परवानगीदेखील मिळल्या होत्या. पोलीस प्रशासन, अग्निशमन दलासोबत सर्व बोलणीही झाल्या होत्या. सौरभनं असेही सांगितले की, रावण दहन उत्सवाचे आयोजन आम्ही रेल्वे रुळांवर नाही तर मैदानात केले होते. मात्र काही लोक रुळावर जाऊन उभे राहिले आणि अचानक ट्रेन आली. भरधाव ट्रेन येत असल्याचे लोकांना कळण्याच्या आतच होत्याचे नव्हते झाले. ही दुर्घटना निसर्गाचा एक कहर आहे. यात माझी काय चूक?. लोकांनी रेल्वे रुळांवर उभे राहू नये, याबाबत आम्ही किमान 8 ते 10 वेळा घोषणा केली. या दुर्घटनेमुळे माझं संपूर्ण कुटुंब दुःखात आहे, असे सांगत सौरभ मदान स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.