अमृतसर : रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेननं चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये 19 ऑक्टोबरच्या रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61 जण मृत्युमुखी पडले, तर 72 जण जखमी झाले. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. दरम्यान, या दुर्घटनेनंतर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत आणि दुसरीकडे पोलीस रावण दहन कार्यक्रमाचा आयोजक व काँग्रेस नेत्याचे पुत्र सौरभ मदानचा शोध घेत आहेत. रेल्वे दुर्घटनेनंतर सौरभ मदान फरार झाला असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सौरभ मदान मिट्ठूच रावण दहन कार्यक्रमाचा प्रमुख आयोजक होता आणि घटनेनंतर तो फरार झाला.
एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, दुर्घटना स्थळ परिसराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, यात अमृतसर दुर्घटनेनंतर सौरभ मदाननं गाडीत बसून पळ काढल्याचं पाहायला मिळत आहे. दुर्घटनेच्या रात्रीपासून सौरभ फरार झाला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, जसा अपघात घडला त्याचवेळेस सौरभ मदानसहीत दोन जण रस्त्यावर पळताना दिसेल. यानंतर तेथे एक गाडी आली, यामध्ये बसून सौरभनं पळ काढला. सौरभ आपल्या संपूर्ण कुटुंबासहीत भूमिगत झाला आहे.
(... त्यामुळे मी ट्रेन पुढे नेली, DMU रेल्वेच्या ड्रायव्हरचा लेखी जबाब)
दरम्यान, सौरभ मदान मिट्ठूवर रावण दहन कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात कित्येक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी शनिवारी (20 ऑक्टोबर) त्यांच्या निवासस्थानावरही हल्ला केला, दगडफेक करत घराच्या खिडक्या फोडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, मदान कुटुंबीयासंहीत अज्ञात ठिकाणी गेले आहेत. त्यांनी आपला मोबाइलदेखील बंद करुन ठेवला आहे. या दुर्घटनेप्रकरणी अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सौरभ मदान सध्या समोर येत नाही, असे म्हणत नागरिकांना आक्रोश व्यक्त केला आहे.
कशी घडली दुर्घटना?
रावण दहन पाहण्यासाठी हजारो लोक चौडा बाजारात जमले होते. रावण दहनावेळी फटाके फुटू लागल्यानं त्यापासून लोक दूर जाऊ लागले. त्यातील 300 हून अधिक जण बंद असलेल्या फाटकाजवळील रेल्वे रुळावर जाऊन उभे राहिले. ते सारे जण हा सोहळा पाहण्यात व त्याचे मोबाइल चित्रीकरण करण्यात इतके मग्न झाले की, फटाक्यांच्या धूमधडाक्यात समोरुन ट्रेन येत असल्याचंही भान त्यांना राहिले नाबी. एकाच वेळी जालंधरहून अमृतसरकडे एक ट्रेन येत होती तर तेथूनच हावडा मेल जात होती. काही कळायच्या आतच ट्रेन अनेकांना चिरडून पुढे निघून गेली. ज्यांनी एका ट्रेनपासून वाचण्याचा प्रयत्न केला, ते दुसऱ्या ट्रेनखाली सापडले.