अमृतसर : रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61हून अधिक जण ठार, तर 72 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी रेल्वे दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी रेल्वे दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले. पीडितांच्या कुटुंबीयांसोबत संपूर्ण देश आहे. दु:खाच्या प्रसंगी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
याचबरोबर, या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशीचा आदेश दिला आहे. पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी केली जाईल. चार आठवड्यात अहवाल सादर केला जाईल, अशीही माहिती अमरिंदर सिंग यांनी दिली. तसेच, या दुर्घटनेतील पीडितांना मदत म्हणून राज्य सरकारने 3 कोटी रुपये दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.