उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ३ मुलांच्या आईने पतीला घटस्फोट देऊन १२ वीच्या विद्यार्थ्याशी लग्न केलं. शबनम असं या महिलेचं नाव आहे, तिने केवळ शिवा नावाच्या मुलाशी लग्न केलं आहे. आम्ही दोघांनीही आनंदाने लग्न केलं आहे आणि आता आम्हाला एकत्र राहायचं आहे असं शबनमने सांगितलं.
अमरोहाच्या सैदनगली पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे, जिथे २६ वर्षीय शबनमने १७ वर्षीय मुलाशी लग्न केलं. लग्नानंतर दोघांनीही सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती म्हणत आहे की, ती या लग्नात खूप आनंदी आहे. तिला आणि तिच्या पतीला त्रास देऊ नये. ९ वर्षांपूर्वी २०१६ मध्ये शबनमचे तौफिकसोबत लग्न झालं. त्यांना तीन मुली आहेत.
तौफिकचा वर्षभरापूर्वी अपघात झाला. त्यानंतर तो शारीरिकदृष्ट्या कमकुवत झाला. तौफिक ई-रिक्षा चालवून घर चालवतो. याच दरम्यान शबनम त्याच परिसरातील शिवाच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत राहण्याचा आग्रह धरू लागली. जेव्हा तौफिकला हे कळलं तेव्हा त्याने विरोध केला. दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर हे प्रकरण पंचायतीपर्यंत पोहोचले.
पंचायतीने असा निर्णय दिला की, ती महिला तिच्या स्वेच्छेने कुठेही राहू शकते. ६ एप्रिल रोजी महिलेने एका मंदिरात शिवाशी लग्न केलं. शिवा म्हणाला की, "मी बारावीचा विद्यार्थी आहे. मी साडे सतरा वर्षांचा आहे. आमचं प्रेमप्रकरण ६ महिन्यांपूर्वी सुरू झालं. मी दररोज मॉर्निंग वॉकला जायचो. तिथेच माझी शबनमशी ओळख झाली. शबनमही मॉर्निंग वॉकला येत असे. हळूहळू आम्ही प्रेमात पडलो."
"आम्ही दोघांनीही आपल्या मर्जीने लग्न केलं आहे. आम्ही दोघेही आनंदी आहोत. आमच्या आयुष्यात कोणीही हस्तक्षेप करू नये." शिवाचे वडील दाताराम सिंह म्हणाले की, त्यांच्या मुलाने त्याला जे करायचं होतं ते केलं आहे. एक वडील आपल्या मुलाच्या विरोधात कसे जाऊ शकतात? आता मुलाने लव्ह मॅरेज केलं आहे, त्याची पत्नी त्याच्यासोबत राहण्यास तयार आहे.