महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासह प्रयागराजमधील पवित्र महाकुंभात स्नान केलं आहे. यावेळी पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा त्यांच्यासोबत होत्या. आत्तापर्यंत ५० कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करून इतिहास रचला आहे. महाकुंभमधील शाहीस्नानानंतर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत.
"मला येथे येऊन खूप छान वाटलं. एक भावपूर्ण, अद्वितीय, अद्भूत अनुभव होता. पुढील कुंभ नाशिकमध्ये होणार आहे, त्यासाठी खूप उत्साही आहे. लोक श्रद्धेने येतात, त्यामुळे त्यांच्यासाठी चांगली व्यवस्था असायला हवी अशी इच्छा आहे. आम्ही त्यांना एक सुंदर अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहोत. खूप जण येतील अशी आशा आहे. सर्व व्यवस्था येथे खूप चांगली आहे."
"१४४ वर्षांनंतर हा महाकुंभाचा योग आला. मी माझ्या कुटुंबासह महाकुंभला येऊ शकलो, याचा मला खूप आनंद आहे. लोक आनंदी आहेत. कोट्यवधी भाविकांनी गंगेत स्नान करून नवा इतिहास आणि विक्रम रचला. मी यूपी सरकार आणि सीएम योगी यांचे अभिनंदन करतो. त्यांनी अतिशय सुंदर व्यवस्था केली आहे" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.