श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. गुरुवारी (11 ऑक्टोबर) सकाळी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या दोन दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीचा या चकमकीत खात्मा करण्यात आला आहे.
मन्नान वाणीने अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याने हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सहभाग घेतला. मन्नान वाणीचे हातात रॉकेट लाँचर घेतलेले छायाचित्र आणि त्याने लिहीलेले खुले पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आम्हाला भारतीय असोत किंवा काश्मिरी नागरिक असोत कोणालाही ठार करण्यात काहीही स्वारस्य नाही, जे आम्हाला दहशतवादी म्हणतात त्यांनी एक तर त्यांची पाठ्यपुस्तके बदलावीत किंवा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा म्हणजे लढणे हे आमचे काम नसून ती आमची गरज आहे हे आमच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या लक्षात येईल असेही मन्नान वाणीने त्याच्या पत्रात म्हटले होते.
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी पहाटेपासून चकमक सुरू झाली होती. कुपवाडा जिल्ह्यात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला होता. खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. त्यानंतर काही वेळाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.