नवी दिल्ली- अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी(AMU)तल्या विद्यार्थी संघाच्या हॉलमध्ये पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचा फोटो लावल्यामुळे नवा वाद उद्भवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीतल्या माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना आजीवन मानद सदस्यता देण्याच्या कार्यक्रमालाही विरोध करण्यात आला आहे.हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी जिन्ना यांचा फोटो हटवण्याची मागणी करत अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या बाहेर जोरदार विरोध प्रदर्शन केलं. विरोध प्रदर्शन करणा-या कार्यकर्त्यांनी जेव्हा AMUमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी हमीद अन्सारींच्या कार्यक्रमालाही विरोध केला असून, ते हत्यारं घेऊन अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विद्यार्थी संघाच्या पदाधिका-यांनी केलाय.पोलिसांनी युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांविरोधात अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचंही विद्यार्थी संघानं म्हटलं आहे. तसेच युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडल्यामुळे विद्यार्थी संघाच्या पदाधिका-यांनी पोलीस ठाण्यात पोहोचून विरोध प्रदर्शन केलं. त्याच वेळी विद्यार्थी संघाच्या पदाधिका-यांनी एसपींना धक्काबुक्की केली. त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे. यात जवळपास 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत.
AMUमधला जिन्ना वादः एसपींना धक्काबुक्की, लाठीचार्जमध्ये 15 विद्यार्थी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 8:11 PM