नवी दिल्ली : अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. मीडियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्यामुळे विद्यापीठाकडून पदवी परत करण्यास सांगितले जात आहे, असा आरोप एका विद्यार्थ्याने केला आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.
देशातील प्रतिष्ठित अलीगढ मुस्लीम विद्यापीठातून पीएचडी केलेल्या दानिश रहीम याचे म्हणणे की, मीडियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा करणे त्याला चांगलेच महागात पडले आहे. नरेंद्र मोदींची स्तुती केल्याबद्दल अलीगढ मुस्लीम विद्यापीठ प्रशासनाने त्याला पदवी परत करण्याची नोटीस पाठवली असल्याचा आरोप दानिश रहीम यांनी केला आहे. याप्रकरणी दानिश रहीम याने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
दानिश रहीम म्हणाला की 'अलीगढ मुस्लीम विद्यापीठाने मला भाषाशास्त्रात मिळालेली पदवी परत करण्यास सांगितले आणि त्याऐवजी जाहिरात आणि विपणन (LAM) मध्ये पदवी घेण्यास सांगितले आहे. मी मोदींची स्तुती केल्यामुळे माझ्यासोबत हे घडत आहे'. तसेच, एका वृत्तवाहिनीशी बोलताना नरेंद्र मोदींची स्तुती केल्याबद्दल भाषाशास्त्र विभागाच्या प्रमुखाने आपल्याला फटकारल्याचा दावा दानिश रहीमने केला.
याशिवाय, विद्यापीठाच्या संस्कृतीच्या विरोधात असलेली अशी कामे करण्यापासून दूर राहण्यास सांगितले होते, असे रहीम यांनी सांगितले. याचबरोबर, तो पुढे म्हणाला की, "मला माझी पीएचडी पदवी अलीगढ मुस्लीम विद्यापीठामध्ये जमा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. ही प्रतिष्ठित पदवी मिळवण्यासाठी मी 5 वर्षे मेहनत केली आहे. मी माझी पदवी कशी परत करू शकतो? जर अलीगढ मुस्लीम विद्यापीठाने माझी पीएचडी पदवी रद्द केली, तर माझे संपूर्ण करिअर धोक्यात येईल."
आरोप पूर्णपणे निराधार - प्राध्यापक दुसरीकडे, अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे प्राध्यापक शफी किडवे म्हणाले की, हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. विद्यार्थ्याने भाषाशास्त्र विभागाच्या एलएएम कोर्समध्ये एमए आणि पीएचडी केली, जे भाषाशास्त्रात पीएचडी देखील देते. त्याने एलएएममध्ये एमए केले असल्याने त्याला एलएएममध्ये पीएचडी पदवी मिळायला हवी. चुकून विद्यार्थ्याला भाषाशास्त्रात पीएचडीची पदवी देण्यात आली, त्यामुळे पदवी बदलण्यास सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, प्रशासकीय निर्णयावर राजकारणाचा प्रभाव नसतो. चुकून त्याला भाषाशास्त्रात पीएचडीची पदवी देण्यात आली. ही चूक सुधारली जाईल. या घटनेचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. दरम्यान, नोटीस जारी झाल्यापासून 7 दिवसांच्या आत बदलीसाठी दानिश रहीमला 'चुकीची पदवी' परत करण्यास अलीगढ मुस्लीम विद्यापीठाने सांगितले होते.